

विकास गामणे
नाशिक | कांद्याचे दर घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असला तरी, नव्या वर्षात हाच कांदा ग्राहकांना रडविणार आहे. आशिया खंडात कांद्याचे आगार अशी ओळख असणाऱ्या नाशिक जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीच्या क्षेत्रात तब्बल सव्वा लाख हेक्टरची घट झाली आहे. परतीच्या पावसासह रोप टंचाईचा आणि वातावरणाचा फटका बसल्याने रब्बी हंगामातील कांदा लागवड क्षेत्र घटल्याने साठवणूक करता येणाऱ्या कांद्याची पुढील वर्षी टंचाई निर्माण होऊन दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या रब्बी हंगामातील लागवड अहवालातून ही बाब समोर आली आहे. रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्यात आहे. बाजारपेठेत लेट खरीप हंगामातील कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर घसरले आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे मात्र, हंगामातील कांदा लागवडीत घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या चार तालुक्यांत खरीप, लेट खरीप आणि रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड होऊ शकलेली नाही. इगतपुरी तालुक्यात केवळ रब्बी हंगामातील कांद्याची अत्यल्प लागवड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातून देखील रब्बी हंगामातील कांदा लागवडीला ब्रेक लागला आहे. यंदाच्या वर्षी निफाड, सिन्नर, चांदवड, येवला, मालेगाव, सटाणा, नांदगाव, देवळा आणि कळवण या नऊ तालुक्यांवरच कांदा उत्पादनाची मदार असणार आहे. विभागात धुळे, साक्री आणि शिंदखेडा या धुळे जिल्हयांतील तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यांतील तालुक्यांत देखील कांदा लागवड होऊ शकलेली नाही. अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे कांद्याची रोपे देखील भुईसपाट झाली. परिणामी कांदा लागवड झाली नाही.
नाशिक विभागात रब्बी कांदा लागवडीचे दोन लाख 21 हजार 335 हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. सन 2023-24 या वर्षात 1 लाख 67 हजार 286 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. यंदा प्रत्यक्षात मात्र, 99 हजार 195 हेक्टर क्षेत्रावरच रब्बी हंगामातील कांदा लागवड झाली आहे. अजूनही एक लाख 22 हजार 141 हेक्टरवरील कांदा लागवड प्रलंबित आहे. ही कांदा लागवड अजून सुरू असल्याने लागवड क्षेत्रात अजून वाढ होऊ शकणार आहे. सर्वाधिक घट नाशिक जिल्ह्यात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रब्बी कांद्याचे एक लाख 93 हजार 174 हेक्टर इतके सरासरी क्षेत्र असून, प्रत्यक्षात 88 हजार 648 हेक्टरवरील कांदा लागवड पूर्ण झाल्याची नोंद आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान झाले. नव्याने कांद्याची रोपे तयार करण्याची वेळ आल्याने रब्बी कांदा लागवडीचा हंगाम एक महिन्यांनी लांबणीवर पडला. कांदा बियाणे अल्प असल्याने त्यांची बाजारात टंचाई झाली. परिणामी चढ्या दराने बियाणे खरेदी करावी लागली. त्यामुळे कांदा रोप उशिराने तयार झाल्याने लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्याचे दिसत आहे. -
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना