सत्यजित तांबेंच्या प्रश्नावर ‘ते’ म्हणाले, ‘आमचं ठरलंय’

सत्कार समारंभात खासदार वाजे-आमदार कोकाटे अन् सत्यजित तांबेंची जुगलबंदी

Rajabhau Waje, Satyajit Tambe, Manikrao Kokate
सत्कार समारंभात खासदार वाजे-आमदार कोकाटे अन् सत्यजित तांबेंची जुगलबंदी

सिन्नर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सिमा या उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित नागरी सत्कार समारंभाच्या निमित्ताने खासदार राजाभाऊ वाजे व आमदार माणिकराव कोकाटे हे राजकीय विरोधक बऱ्याच दिवसांनी प्रथमच एका व्यासपीठावर आले. त्यामुळे उपस्थित उद्योजक त्यांचे हावभाव टीपत होते. दोघे भाषणादरम्यान काय बोलतात, याचीही त्यांना उत्सुकता होती. झाले तसेच. सवाल-जवाब, हंशा, टाळ्या आणि कोपरखळ्यांनी हा कार्यक्रम चांगलाच रंगला.

नाशिक येथे एका आंदोलनात अडकल्याने खासदार वाजे कार्यक्रमस्थळी तासभर उशिराने पोहचले. व्यासपीठावर येताच सत्कार समारंभ आटोपून माजी मंत्री बाळासाहेब थोरात नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर काही वेळात आमदार सत्यजित तांबे यांचे आगमन झाले. व्यासपीठावर स्थानापन्न होताच तांबे यांनी आमदार कोकाटे व खासदार वाजे यांच्याशी हसतमुखाने संवाद साधला.

भाषणावेळी तर त्यांनी संवादातून चौकार, षटकारांची आतषबाजी सुरु केली. राजाभाऊ दिल्लीत आणि आमदार कोकाटे मुंबईत, असे तुम्ही ठरवून घेतले का? असा मिश्किल सवाल करताच उपस्थितांमध्ये एक हंशा पिकला.

व्यासपीठावरील मान्यवर खळखळून हसत असताना राजाभाऊ वाजे मात्र हसू लपवत आहेत, ही बाब सत्यजित तांबे यांनी हेरली आणि पुन्हा ‘राजाभाऊ मात्र हसत नाहीत’ अशी गुगली टाकली. यावर मात्र राजाभाऊंनाही हसू आवरले नाही. हजरजबाबी माणिकरावांनी आमदार तांबे यांच्या सवालावर ‘ते आमच्या हातात नाही’ असे सांगत उद्योजक आणि उपस्थितांकडे बोट दाखवत ‘यांच्या हातात अर्थातच मतदारांच्या हातात आहे’, असे सांगितले. मग, उद्योजकांनीदेखील ‘हो, आमचं ठरलंय! राजाभाऊ दिल्लीत गेलेत आता कोकाटे साहेबांना पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे.’ असा सूर व्यक्त करीत समर्पक उत्तर दिले.

या जुगलबंदीमुळे सभागृहातील वातावरण अतिशय हलकेफुलके झाले होते. आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेले वाजे समर्थक राजेश गडाखही स्मितहास्य करीत या सगळ्याचा अंदाज घेत होते.

‘राजाभाऊ दिल्लीत गेले म्हणजे तुमचाही हेतू साध्यच’

आमदार कोकाटे यांनी भाषणात विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान उद्योजक सत्कारसभारंभाची तयारी करीत होते. मात्र मी, बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे असे सगळेच अधिवेशनात अडकलेलो असल्याने श्नय नव्हते. उद्योजकांना आम्ही सगळे एकत्र पाहिजे होतो. मग आजचा योग जुळून आला. ‘तुमचा हेतू साध्य झाला...आता माझा करा’ अशी कोपरखळी उद्योजकांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने मारली. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडून आमदार तांबे यांनी ‘राजाभाऊ दिल्लीत गेले म्हणजे तुमचाही हेतू साध्यच झाला आहे’ असे समर्पक विधान केले. त्यामुळे सभागृहात पुन्हा हास्याचे कारंजे उडाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news