

नाशिक : निल कुलकर्णी
'ढळला रे ढळला दिन सखया... संध्याछाया भिवविती हृदया' ही कविता आज सर्वार्थाने वास्तवात उतरली आहे. मुले मोठी झाली की, आपल्या व्यवधानात व्यग्र होतात. आई- वडील एकाकी होतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संगोपन करुन नावारूपाला आणले. त्या माता-पित्यांच्या नशिबी एकाकीपणाचा शाप वाट्याला येतो. कुणाला मुले नाहीत, जवळचे कुणी नाही म्हणून परवड. पैसा नाही, त्यांना भीषण, भेसूर एकाकीपणा खायला उठतो. त्यामुळे अनेक चांगल्या घरातील वृद्धांसाठी वृद्धाश्रमे आयुष्याची सांजवेळ सोनेरी करणारी ठरत आहेत.
संध्याछाया भिवविती हृदया नव्हे, वृद्धाश्रमांनी 'रमविती हृदया.!'
वृद्धाश्रमे संध्याछायेतील 'प्रकाश'
नाशिक येथील जेलरोड परिसरात पत्नीच्या आजाराच्या वेदनांनी व्यथित वृद्ध मुख्याध्यापकाने पतीचा खून करून स्वत:ही मरणाला कवटाळले. या हृदयद्रावक घटनेने आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांची परवड, पैसा असून कुणी आधार नसणे, एकाकीपणा हे मुद्दे पुन्हा ऐणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर 'पुढारी'ने शहरातील वृद्धाश्रमांचा आढावा घेतला असता, वृद्धाश्रमात प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी दिसून आली. त्यामुळे वृद्धाश्रमे ही शाप नसून, काळाची गरज असल्याने ते वरदानच ठरत असल्याच्या प्रतिक्रिया वृद्धाश्रमांच्या संचालकांनी दिल्या.
काही वर्षांपूर्वी घरातील वृद्ध माता- पिता, आजी- आजोबांना वृद्धाश्रमात टाकणे असंस्कारक्षम, स्वार्थी मनोवृत्तीचे मानले जात होते. आज विविध कारणांनी जवळचे नातेवाईक हे प्रियजन वृद्धांना जवळ ठेवण्यास अक्षम ठरत आहेत किंवा वृद्धांना अन्य कोणीच नसल्याने वृद्धाश्रमच जवळचे वाटत आहेत म्हणूनच वृद्धांसाठी वृद्धाश्रमे आयुष्याच्या सांजवेळी सहारा देणारे 'वात्सालय' ठरत आहेत. विशेष म्हणजे ज्यांना मुले आहेत, असेही वृद्ध वृद्धाश्रमातील जीवनाला आपलेसे करून आयुष्याची सांजवेळ अर्थपूर्ण करताना दिसत आहेत. शहरात पाथर्डी शिवाराजवळील निसर्ग कॉलनीतील मानवसेवा, जत्रा हॉटेलजवळील वृद्धाश्रम नि:शुल्क असून, वृद्धासाठी मायेची सावली ठरले आहेत. यासह शहरात १० हून अधिक वृद्धाश्रमांत वयोवृद्ध हे एकटेपणा टाळण्यासाठी त्यांचा आधार घेत आयुष्याची संध्याकाळ सोनेरी करत आहेत.
वृद्धाश्रमे शाप नसून काळाची गरज झाली आहेत. आमच्या येथे आज 450 वृद्ध प्रतीक्षेत आहेत. गरिबी, पैसे नसणे, वृद्धापकाळाने काम करू न शकणे, जवळच्या नातेवाइकांचा आधार नसणे यांमुळे वृद्धाश्रमात येणाऱ्यांची संख्या गेल्या २० वर्षांत वाढली आहे.
टी. एल. नवसागर, संस्थापक, अध्यक्ष, मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम.
एकूण वृद्धाश्रमे; १२ हून अधिक
मदर टेरेसा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रेमदान वृद्धाश्रम - ८४ पुरुष (यामध्ये निराधार दिव्यांग, मानसिक विकलांग यांचाही समावेश)
वात्सल्य वृद्धाश्रम - ४० आजी, ३९ आजोबा. एकूण - 79
मानवसेवा केअर टेकर वृद्धाश्रम : ४८ महिला, ४० पुरुष एकूण - ८८ वृद्ध (काही मानसिक विकलांग)
आता वेळ झाली 'सुखांता'ची..! वृद्धाश्रम असायलाच हवे. आयुष्याची सांजवेळ असाह्य झाली की, मुले प्रियजनांवर ओझे होऊन जगण्यापेक्षा 'वेळ झाली' की, 'सुखांत'ने जाता यावे असा कायदा यावा. ही आत्महत्या नव्हेच. सुखाने जगण्याचा मनुष्याला जसा अधिकार आहे तसे सुखांत होऊन जग सोडण्याचाही अधिकार हवाच.
माधुरी करंदीकर, नाशिक.