

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या अनेक भागांतून नैर्ऋत्य मोसमी वारे परतीच्या प्रवासाला लागले असतानाच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. नाशिकमध्येही तापमानाने अचानक उसळी घेत पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा, तर पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा, अशा परस्परविरोधी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, अंगदुखी, घशादुखी यांसारख्या तक्रारी घेऊन दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या बदलत्या वातावरणाचा अधिक त्रास होत आहे.
हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यातील तापमानाबाबत अंदाज व्यक्त केला असून, पुढील काळातही तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल जाणवत आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडताना गारवा जाणवत असला, तरी सूर्य वर येताच उन्हाची तीव्रता वाढते. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवत असून, तापमान ३५ अंशांच्या आसपास पोहोचत आहे. सायंकाळनंतर पुन्हा वातावरणात गारवा निर्माण होत आहे.
या बदलामुळे शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास अडचण निर्माण होत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अशक्तपणा यांसारख्या तक्रारी जाणवत आहेत.
दरम्यान, मान्सूनच्या परतीच्या प्रक्रियेसोबत वातावरणातील बदल अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नाशिककरांसाठी दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटेच्या गारव्याचा सामना करण्याचे ठरणार आहेत. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
लहान मुले, ज्येष्ठांना अधिक धोका:
वातावरणातील अचानक बदलाचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होण्याची शक्यता असते. दिवसभरातील तापमानातील मोठ्या फरकामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढू शकतात.
त्यामुळे लहान मुलांना सकाळच्या गारव्यात आणि दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे आणि अचानक थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जाणे किंवा त्याउलट बदल शक्यतो टाळावा.