

सिन्नर : सिन्नर - शिर्डी मार्गावर दुचाकीने जात असलेला तरुण गुरुवारी (दि. 26) मुसळगाव शिवारात नायलॉन मांजाने जखमी झाला. त्यानंतर त्याच्या दुचाकीला अपघातही झाला.
या घटनेत तरुणाच्या गळ्याला व हाताला जखम होऊन, अपघातानंतर बरगडी फ्रॅक्चर झाली. स्वप्निल चंद्रभान मोहिते (26, रा. हिवरगाव, ता. अकोले) असे या तरुणाचे नाव आहे. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जखमी तरुणाला संगमनेर येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले. स्वप्निल हा सकाळी दुचाकीवरून जात असताना मुसळगाव येथे नायलॉन मांजाने त्याच्या गळ्याला जखम झाली. मांजा हाताने पकडत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, त्यात त्याची बरगडीही तुटली. अपघातानंतर जखमी तरुणाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जखम मोठ्या प्रमाणात असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा पाटील यांनी प्राथमिक उपचार केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली.
दि. 1 डिसेंबर रोजी उद्योग भवन परिसरात अरुण चांडोले (रा. नायगाव रोड) या वृद्धाचा, दि. 16 डिसेंबर रोजी झापवाडी शिवारात गोपी फोडसे या भाटवाडीच्या तरुणाचा, तर दि. 23 डिसेंबर रोजी नंदकुमार मोटे या 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा संगमनेर नाका परिसरात नायलॉन मांजाने गळा चिरला होता. आता महिनाभरात ही चौथी घटना घडली असल्याने सुजाण नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नायलॉन मांजा दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतत असतानाही त्याचा सर्रास वापर होत असल्याने धडक मोहीम राबवून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.