

सिन्नर (नाशिक) : नगर परिषदेने नायलॉन मांजा विक्री व वापर करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
घाऊक किंवा किरकोळ विक्रेते नायलॉन मांजा विकताना आढळल्यास, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एखाद्या व्यापार्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास जप्ती व दंड ठोठावण्यात येईल. एखादा नागरिक नायलॉन मांजाने पतंग उडवत असल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 अंतर्गत कडक कारवाई केली जाईल.
अभिजित कदम, मुख्याधिकारी, सिन्नर नगर परिषद
शहरामध्ये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री आणि वापर होतो. याला प्रतिबंध घालण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथकांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात तपासणी अभियान सुरू केले आहे. मांजाच्या वापरामुळे होणार्या जीवितहानीपासून नागरिक, पक्षी आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
नायलॉन मांजा अथवा चायनीज मांजा अत्यंत धारदार व धोकादायक असल्यामुळे त्याचा वापर केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यतानिर्माण होते. मागील काही वर्षांमध्ये या मांजामुळे अनेक पक्ष्यांचे मृत्यू, नागरिकांचे गळे व इतर शारीरिक अवयव चिरले जाणे, दुचाकीस्वारांचे अपघात, विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशानुसार सिन्नर नगर परिषदेकडून कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.