

नाशिक : शहरात ध्वनिप्रदूषण झपाट्याने वाढत असून, पंचवटी कारंजा आणि द्वारका यांसारख्या निवासी भागांसह सीबीएस, त्र्यंबकरोड, पाथर्डी फाटा आणि मुंबईनाका यांसारख्या व्यावसायिक भागांमध्ये ध्वनिप्रदूषणाची पातळी धोकेदायक स्तरावर पोहोचली आहे.
योग्य उपाययोजना न केल्यास नाशिककरांना बहिरेपणा, मानसिक आणि शारीरिक असंतुलन तसेच हृदयविकार यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाले आहे.
शहराचा पर्यावरण अहवाल महासभेत सादर झाला आहे. महापालिकेकडून दरवर्षी वायु, जल व ध्वनि प्रदूषणाची गणना करून त्यासंदर्भातील अहवाल तयार केला जातो. त्यानुसार स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या नाशिकमध्ये ध्वनीप्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार शहरातील निवासी, व्यापारी, औद्योगिक आणि शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी पातळीची मोजणी करण्यात आली. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून पंचवटी कारंजा, द्वारका, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा, सीबीएस, त्र्यंबक रोड, बिटको कॉलेज, मुंबई नाका आणि मानवता हॉस्पिटल परिसरात घेतलेल्या मोजमापांमध्ये गंभीर बाबी आढळून आल्या.
निवासी क्षेत्रातील ध्वनिमर्यादा दिवसा ५५ डेसीबल व रात्री ४५ डेसीबल असताना, पंचवटी कारंजा परिसरात ती अनुक्रमे ६५.८ आणि ५७.२ डेसीबल आढळली. द्वारका परिसरातही ही पातळी अधिक असून, दिवसा ७३.३ तर रात्री ६५.३ डेसीबल इतकी नोंदवली गेली.
व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसीबल मर्यादा असताना, सीबीएस बसस्थानक परिसरात ती अनुक्रमे ७६.३ व ६९.६ डेसीबल इतकी वाढलेली दिसून आली. विशेषतः शांतता क्षेत्रातील ध्वनिपातळीही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने, नाशिकमध्ये वाढते ध्वनिप्रदूषण नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, ध्वनिक्षेपकांचा कर्णकर्कश आवाज, सण-उत्सवातील डिजे, फटाके व औद्योगिक यंत्रसामग्रीमुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. यामुळे रक्तदाब वाढणे, चिडचिड, कार्यक्षमता घटणे, पचन बिघडणे, बहिरेपणा आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहेत.