

नाशिक : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या एनओसीची अट शिथिल करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दिव्यांगांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी (दि. १६) आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीस आरडीसी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, तहसीलदार आबासाहेब तांबे, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, शहराध्यक्ष अनिल भंडागे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष दत्तू जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांच्यासह दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते.
यूडीआयडी कार्डचे व्हेरिफिकेशन पूर्ण करत पात्र लाभार्थ्यांना २,५०० रुपयांची मदत सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. आधार व्हेरिफिकेशन न झालेल्या दिव्यांगांची स्वतंत्र यादी मागवून ज्यांचे व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे, त्यांना प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही प्रसाद यांनी दिली. दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी लिफ्ट
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर लिफ्टसाठी तरतूद करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दिव्यांगांसाठी विशेष लोकशाही दिन
दिव्यांगांच्या समस्या प्रभावीपणे जाणून घेण्यासाठी तालुकास्तरावर विशेष लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.