

NMC task force steps up dengue swine flu screening
नाशिक : गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासनाने आजार नियंत्रणासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून डेंग्यू, मलेरिया यांसह साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने उपचार व प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज केली आहे.
आयुक्त खत्री यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन शहरातील विविध आजारांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रभारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांच्या समवेत जुने नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सुविधांची पाहणी केली.
१० ते २५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात आलेल्या डेंग्यू तपासणी मोहिमेत आशा वर्कर्ससह सुमारे ४०० जणांचा सहभाग होता. टास्क फोर्सच्या माध्यमातून तब्बल १ लाख ७० हजार घरांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे साडेसहा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १ हजार ४२७ तापाचे रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले असून, गतवर्षी याच कालावधीत ही संख्या १४० होती. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ४० रुग्णांची नोंद झाली आहे. आता १० ते २० सप्टेंबरदरम्यान पुन्हा जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या उपाययोजना
डेंग्यू, मलेरिया व अन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती.
कचरा न उचलल्याने घंटागाडी ठेकेदारांना आठ लाख रुपयांचा दंड.
तपोवनात गप्पी मासे पालन केंद्राची स्थापना.
डेंग्यू, मलेरियाचे 'ब्लॅक स्पॉट' शोधून ते नष्ट करण्याची मोहीम.
स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालय संचालकांची बैठक.
बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र विशेष कक्ष.
नदीपात्रातील पाणवेली हटविण्यासाठी विशेष मोहीम
पाणवेलींच्या संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी.
मोठ्या सोसायट्या, संस्थांना कचरा विलगीकरण सक्तीचे अन्यथा कारवाई
स्वाइन फ्लूच्या ११९ रुग्णांची नोंद
शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ११९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ऑगस्ट महिन्यात तब्बल ९१ रुग्णांची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रुग्णाला आवश्यक औषधांची गरज भासल्यास महापालिकेच्या रुग्णालयांमधून ती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बिटको आणि डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र विशेष कक्ष तयार करण्यात येणार असून, खासगी रुग्णालयांच्या संचालकांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.
सरकारी कार्यालयेही रडारवर
सरकारी कार्यालयांमध्ये थेट तपासणी करताना काही मर्यादा असल्या तरी डेंग्यूच्या उत्पत्तीची ठिकाणे अशा परिसरात आढळून येतात. त्यामुळे आयएसपी, सीएनपी प्रेस, जिल्हा परिषद इमारत आदी ठिकाणी विशेष तपासणी करण्यात येणार आहे.