

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक पदांच्या भरतीसंदर्भात महापालिकेने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता दिली आहे. या नोकरभरतीला आस्थापना खर्चाची अट अडचणीची ठरत आहे. शासनाने ही अट शिथिल केल्यानंतरच नोकरभरतीचा मार्ग प्रशस्त होऊ शकणार आहे.
दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. १९९५ मध्ये मंजूर झालेल्या आकृतिबंधानुसार महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर ७०९२ पदे असून, रिक्त पदांमुळे जेमतेम चार हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जोरावर महापालिकेचा गाढा हाकला जात आहे. गेल्या ३० वर्षांत शहराचा वाढलेला विस्तार, तिपटीने वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सेवा-सुविधा पुरविताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची दमछाक होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेला व्यवस्थापन करणे अवघड होणार आहे. ही बाब लक्षात घेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अत्यावश्यक सेवांशी संबंधित किमान ७०६ रिक्त पदे भरतीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या बैठकीत याकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्य सचिवांनी लवकरच भरतीसाठी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले.
रिक्त पदांच्या नोकरभरतीपूर्वी सुधारित आकृतिबंधाला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. महापालिकेने २०१७ मध्ये १४ हजार ९४४ पदांचा आकृतिबंध शासनाला सादर केला होता. शासनाने आवश्यक असलेल्या सर्व पदांचा विचार करून नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार ९०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध मार्च २०२४ रोजी महासभेच्या मान्यतेनुसार शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा आकृतिबंध मंजूर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
अग्निशामक-आरोग्य : ६२१
अभियांत्रिकी : १४०