

नाशिक : नाशिककरांसाठीच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रासाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या पुष्पोत्सवाची तयारी महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव आयोजित केला जाणार असून, यंदा पुष्प प्रदर्शनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिककर रसिकांना उपभोगता येणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आघाडीच्या सिनेकलावंतांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश शहरभर पोहोचविण्यासाठी तसेच नाशिककरांमध्ये फळा-फुलांविषयी आवड निर्माण करण्याच्या हेतूने प्रथम महापौर स्व. शांताराम वावरे यांनी १९९३ मध्ये महापालिकेच्या वतीने पुष्पोत्सव आयोजनाची परंपरा सुरू केली होती. ती २००८पर्यंत काही अपवाद वगळता अखंड सुरू होती. परंतु २००८ मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागात उघडकीस आलेला कोटेशन घोटाळा आणि त्यात तत्कालीन उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांचा सहभाग यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली. त्यानंतर २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सव आयोजनाची तयारी केली होती. परंतु त्याआधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ आयुक्तपदी विराजमान झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करत पुष्पोत्सव आयोजनाला ब्रेक लावला होता. परंतु मुंढे यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेत फेब्रुवारी २०१९ मध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन करीत पुन्हा या परंपरेला चालना दिली. तत्कालीन उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी आयुक्त गमे यांची योजना मूर्त स्वरूपात उतरवली. २०२० मध्येही ही परंपरा कायम राहिली. मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पुष्पोत्सव आयोजनावर निर्बंध होते. या महामारीचे संकट दूर झाल्यानंतर उद्यान अधीक्षक भदाणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून उद्यान विभागामार्फत पुष्पोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. पुष्पोत्सवाकरिता अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन प्रांगणात तीनदिवसीय पुष्पोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएअचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. यात प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रमानिमित्त मुख्यालय प्रांगणात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या पुष्पोत्सवाला भेट देत असतात.
यंदाचा पुष्पोत्सव नाशिककरांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. पुष्पोत्सवात आघाडीच्या सिनेकलावंतांना निमंत्रित करताना स्थानिक कलावंतांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुष्पोत्सवात नर्सरीसह, विविध खाद्यपदार्थांचे ५०हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, महिला बचतगटांना सवलतीच्या दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.