

नाशिक : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील अनागोंदी कारभार समूळ नष्ट करण्याचा विडा नूतन आयुक्त मनीषा खत्री यांनी उचलल्यानंतर महापालिकेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. आयुक्तांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे भविष्यात चौकशीचा ससेमिरा नको म्हणून काही अधिकाऱ्यांनी स्वत:हून बदल्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर काहींच्या कामकाजाबाबत कर्मचारी संघटनांच्या तक्रारी असल्यामुळे भाकरी फिरण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. विशेषत: भूसंपादन, नगररचना आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीत नागरिक समस्यांचे निराकरण कठीण झाले आहे. मूलभूत सेवा-सुविधांविषयक तक्रारींचे निराकरणही होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार कामांच्या निविदा प्रक्रियेत रिंग करत असल्यामुळे गुणवत्तापूर्ण कामांची अपेक्षा संपुष्टात आली होती. अशा परिस्थितीत मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. प्रशासनाला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान खत्री यांच्यासमोर आहे. त्या दिशेने पावले टाकण्यास त्यांनी सुरुवातदेखील केली आहे.
त्यातूनच महापालिकेत बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत नगररचना विभागात बदल्या करून घेण्यासाठी स्पर्धा लागत असे. परंतु, बदल्या झाल्यानंतर कामाऐवजी चुकीच्या कामांचीच अधिक चर्चा झाली. त्यात नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांची बांधकाम व्यावसायिक किंवा कामकाजानिमित्त नगररचना विभागात येणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधण्याची क्षमता नसल्याने नाराजी निर्माण झाली. भूसंपादन विभागातील काही अभियंते टीडीआर व भूसंपादन प्रकरणात थेट शेतकऱ्यांशी संपर्कात असल्याने या विभागाचे कामकाज चर्चेला आले. बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही त्याच ठिकाणी कार्यरत असल्याने त्यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अनागोंदी कारभारातून काही अधिकाऱ्यांनी माया जमविल्यानंतर आता नूतन आयुक्तांच्या भूमिकेमुळे कारवाईच्या भीतीपोटी या अधिकाऱ्यांनी अन्य विभागांत बदली करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी बदली अर्ज प्रशासनाला सादर केले जात आहेत. यामध्ये नगररचना व भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.