

नाशिक : गेल्या आठ महिन्यात शहरातील 16,990 नव्या मिळकतींना महापालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या माध्यमातून घरपट्टी लागू करण्यात यश आले आहे. यामुळे घरपट्टीच्या महसुलात दरवर्षी 35 कोटी 80 लाख रूपयांची भर पडणार आहे.
जीएसटीतून मिळणाऱ्या अनुदानाखालोखाल घरपट्टीतून मिळणारा महसुल महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी घरपट्टीकरीता 240 कोटी वसुलीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी जवळपास 190 कोटींची घरपट्टी वसूल झाली असून, येत्या चार महिन्यात 50 कोटी वसूल करण्यासाठी कर आकारणी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नव्याने तयार होणाऱ्या तसेच नोंदणी नसलेल्या, वापरातील बदल आणि वाढीव बांधकाम अशा मालमत्तांचा शोध घेऊन मनपाकडून अशा मालमत्तांना कर लागू केला जातो. त्यासाठी मालमत्ताधारकांना विशेष नोटीसा देऊन प्रथम कर निर्धारणाची मागणी केली जाते. 2024-25 या आर्थिक वर्षात कर विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या आठ महिन्यात 16 हजार 990 इतक्या मालमत्तांना कर निर्धारण लागू केले असून, त्यातून मनपाला 35 कोटी 80 लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. यापैकी सध्या आठ कोटी 35 लाख रूपयांची घरपट्टी जमा झाली आहे. कर निर्धारण संदर्भातील विशेष नोटीसा देण्याचे काम सुरू असल्याने त्यानुसार कर संकलनाचे काम कर विभागाकडून केले जात आहे.
कर निर्धारणाचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 500 मीटर क्षेत्रफळाच्या आतील मिळकतींना कर लागू करण्याचे अधिकारी विभागीय अधिकाऱ्यांना आहेत. 500 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मालमत्ता असल्यास त्यावर कर निर्धारण लागू करण्याचे अधिकार हे कर विभागाच्या उपायुक्तांकडे आहेत. कर निर्धारणाच्या या विकेंद्रीकरणामुळे अनेक नव्या मिळकतांना घरपट्टी लागू करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.