नाशिक : जुनाट तंत्रज्ञान आणि अपुरी क्षमता यामुळे महापालिकेची मलनिस्सारण केंद्रे शहरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर पुरेपूर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम नाहीत. त्यातच शहरातील २४ नैसर्गिक नाल्यांमधून वाहून येणारे घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणी गोदावरीसह नंदीनी, वालदेवी आणि वाघाडी नद्यांच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.
नाशिक महापालिका हद्दीतून गोदावरीसह नंदीनी, वालदेवी आणि वाघाडी नद्या वाहतात. या नद्यांना शहरातील विविध भागांतून आलेले २४ छोटे-मोठे नैसर्गिक नाले मिळतात. नाले हे मुख्यत: पावसाचे पाणी वाहून जाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र वाढते नागरीकीकरण, निवासी क्षेत्रात झपाट्याने होत असलेली वाढ आणि त्यातुलनेत सांडपाणी वाहून जाण्यासाठी पर्याप्त क्षमतेच्या भूमिगत गटारींचे जाळे निर्माण करण्यात महापालिकेला आलेले अपयश, यामुळे शहरातील बहुतांश नैसर्गिक नाल्यांमध्ये सांडपाण्याच्या गटारी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांचे रुपांतर मोठ्या उघड्या गटारींमध्ये झाले आहे.
नैसर्गिक नाल्यांमधील हे सांडपाणी गोदावरीसह उपनद्यांमध्ये थेट मिसळत असल्यामुळे नदीप्रदूषणमुक्तीच्या उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी नाल्यांतील पाण्याचे नियमित परिक्षण केले जाणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत गोदावरीसह नंदिनी, वालदेवी, वाघाडीत मिसळणाऱ्या नाल्यांतील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार नदीपात्रातील पाण्याचा बीओडी १० मिलीग्रॅम प्रति लिटरच्या आत असणे आवश्यक असताना नद्यांना मिसळण्यास नाल्यांमधील पाण्याचा बीओडी मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे आढळून आले आहे. चिखली नाल्याचा बीओडी १५, चरण कॉलनी नाल्याचा बीओडी १३.८, चोपडा नाला १५.३, मल्हारखान १५.३ तर जोशीवाडा नाल्याचा बीओडी २० असल्याचे तपासणीस आढळून आले आहे. त्याचप्रमाणे सरस्वती नाला १८, नागझरी नाला १६.८ तर अरुणा नदीचा बीओडी १३.८ असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नाले नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने त्यातील घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणीही नदीपात्रात मिसळत असून त्यामुळे नद्या प्रदूषित होऊन त्यातील पाण्याची गुणवत्ता ढासळल्याचे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गंगापूर गाव, बारदान फाटा, सोमेश्वर, चिखली, आनंदवली, सुयोजित उद्यान, चरण कॉलनी, चोपडा नाला, जोशीवाडा, मल्हारखान, मनोर नाला, आसाराम बापू आश्रम, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सरस्वती नाला, नागझरी नाला, कन्नमवार पुल, जाधव बंगला, केवडीबन, पिंपळपट्टी, पवारवाडी, गंधर्ववाडी, लेंडी नाला तसेच अरुणा नदी, वाघाडी नदीतून सांडपाणी गोदावरीसह उपनद्यांमध्ये मिसळत असल्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत.