

नाशिक : शहराभोवती अतिक्रमणांचा वाढता विळखा रोखण्यासाठी जोरदार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज असताना अतिक्रमण निर्मूलन विभागाकडील मनुष्यबळाचा अभाव या मोहिमेस अडथळा ठरत आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. अतिक्रमण निर्मूलनासाठी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर घेतली जाणार असून, आउटसोर्सिंग माध्यमातून ४० कर्मचाऱ्यांची तीन वर्षांकरिता नेमणूक करण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गांतील ७,०८२ पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे सुमारे तीन हजार पदे रिक्त झाली आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेचा कामकाजाचा गाडा हाकताना अनेक अडचणी येत आहेत. विशेषत: अतिक्रमण निर्मूलनासारख्या मनुष्यबळाची गरज असलेल्या कामकाजात अडथळे येत आहेत. या विभागामध्ये सध्या ५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वाहनचालक, क्लार्क तसेच बिगारी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता, इतक्या कमी मनुष्यबळात शहरात होत असलेले अतिक्रमण हटविणे शक्य नाही. अतिक्रमणांचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी तसेच इतरही समस्या दूर करणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता या विभागाच्या माध्यमातून तीन वर्षे कालावधीसाठी ठेकेदाराची नेमणूक करून मनुष्यबळ तसेच अतिक्रमण हटविण्याकरिता लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून घेतली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांवरील तसेच रस्त्यांगलत असलेले अतिक्रमण हटविण्याबरोबरच सिंहस्थाच्या दृष्टीने पंचवटी विभाग विशेषत: रामकुंड, गोदाघाट, तपोवन, साधुग्राम व परिसरात अतिक्रमण होणार नाहीत आणि असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अतिक्रमणे हटविण्यासाठी ४० कर्मचारी आउटसोर्सिंगच्या माध्यमातू घेण्याकरिता तसेच त्याकरिता लागणारी यंत्रसामग्री यावर जवळपास १६ कोटी ८२ लाखांचा खर्च येणार असल्याचा अंदाज अतिक्रमण निर्मूलन विभागाने व्यक्त केला आहे. यंत्रसामग्रीमध्ये ट्रक, जेसीबी, गॅस कटर, वेल्डिंग मशीन यांचा समावेश असेल.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिक्रमण निर्मूलन प्रभावी राबवण्यासाठी आउटसोर्सिंग माध्यमातून कर्मचाऱ्यांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. रामकुंड परिसर, शाही मार्ग व साधुग्राम परिसर तसेच सिंहस्थ कालावधीसाठी प्रस्तावित मुख्य आठ मार्ग आणि शहरातील इतर रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने हा पर्याय निवडला जात आहे.
मयूर पाटील, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, नाशिक.