

नाशिक : अवकाळी पावसाने शहरात दाणादाण उडविल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी गुरूवारी(दि.२२) महापालिकेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी राहिल्याबद्दल अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीचा सामना करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून, त्यानुसार संबंधित खातेप्रमुखांना जबाबदारींचे वाटप करताना नागरिकांना संपर्कसाठी महापालिका मुख्यालयात आपत्कालिन कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देशही आयुक्त खत्री यांनी दिले.
महापालिका आयुक्त खत्री यांनी गुरूवारी खातेप्रमुखांची बैठक घेत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. वादळे, अतिवृष्टी, पुर व नैसर्गिक आपत्तीमुळे शहरात घरे पडणे, झाड पडणे किंवा पुरामध्ये मालमत्ता वाहुन जाणे. या प्रकारच्या घटना होण्याची शक्यता आहे. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा. अग्निशामक दलाकडील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तैनात स्थितीत असणे आवश्यक आहे, असा सूचना खत्री यांनी दिल्या. शहरातील सहाही विभागात अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी बैठका घेऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कामकाजाची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपआयुक्त नितीन पवार, अश्विनी गायकवाड, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाइत, रविंद्र धारणकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदी उपस्थित होते.
संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याचे आदेश आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास किंवा महावितरण विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्यास त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार असेल तर ही माहिती सर्व विभागांना कळवावी. रस्त्यांवरील खड्डे बुजावावेत, पावसाळी, भुयारी गटारींची वेळोवेळी साफसफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी निचरा होण्यासाठी तातहीने उपाययोजना कराव्यात, आदी सूचना आयुक्तांनी दिल्या.
अतिवृष्टीमुळे घरे पडल्यास मदतीची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्याकडे
तात्काळ बांधकाम विभागाकडील इमर्जन्सी स्कॉडची मदत बोलवणे
मनुष्यहानी झाली तर मदतीची जबाबदारी वैद्यकीय विभागाकडे
पुरग्रस्त स्थितीत जलसंपदा विभागाशी सतत संपर्क ठेवा
नदीपातळी वाढल्यानंतर पूर नियंत्रण कक्षाच्या सुचनेनुसार नागरिकांना
पुरस्थितीत वाढल्यास नदीकाठांवरील नागरिकांचे स्थलांतर करावे
पूर ओसरल्यावर स्वच्छतेची जबाबदारी पशुवैद्यकीय, घनकचरा विभागाची
आणीबाणी प्रसंगी आयुक्तासह सर्व विभागांचा समन्वय असावा