नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली राजीव गांधी भवनासमोर जनआक्रोश मोर्चा काढत सिध्दार्थनगर, संत कंबीरनगर झोपडपट्टीवासीयांनी सोमवारी (दि. १८) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला कडाडून विरोध दर्शविला. शासनाच्या निर्णयानुसार या झोपडपट्ट्या अधिकृत स्लम घोषित करून झोपडीधारकांना आहे त्या जागेवर पक्की घरे बांधण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
'वंचित'चे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, युवक महानगरप्रमुख रवि पगारे, महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येऊन आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. गंगापूर उजव्या कालव्याची जागा जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे. ती महापालिकेकडे ९९ वर्षांच्या करारावर हस्तांतरित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विषयक कामांसाठीच या जमिनीचा वापर करण्याची करारात अट असताना या जागेवर सिध्दार्थनगर व संत कबीरनगर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई १२ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार नगररचना विभागाने दोन्ही झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करत अहवाल तयार केला आहे. या झोपडपट्ट्या हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने झोपडपट्टीवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे. घरे वाचविण्यासाठी दोन्ही झोपडपट्टीवासियांनी संयुक्तपणे मोर्चा काढून अतिक्रमण निर्मूलन मोहीम तत्काळ थांबविण्याची मागणी केली.
अतिक्रमण निर्मूलन कारवाई तत्काळ थांबवावी
महापालिकेने झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात
झोपडपट्टी अधिकृत स्लम घोषित करावी
झोपडीधारकांना पक्की घरे बांधून मिळावीत