

सिडको (नाशिक) : सिडको परिसरातील सिंहस्थनगर येथे सोमवारी (दि.२५ ऑगस्ट) घडलेल्या प्रकाराने मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील शववाहिकेसाठीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.
येथील ज्येष्ठ नागरिक बारकू बंडू कापडणीस (वृद्धापकाळाने निधन पावले) यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी व सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील शववाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी ‘दहा वाजल्यानंतर फोन करा’ असे सांगितले. पुनः संपर्क साधल्यावर ‘गाडी अकरा-साडेअकरा वाजता येईल’ असे आश्वासन मिळाले. पण दुपारपर्यंतही शववाहिका न आल्याने नातेवाईकांनी पुन्हा अनेकदा फोन केला.
त्यावर कर्मचाऱ्यांनी ‘आधीच आठ कॉल केले आहेत, तुम्ही सिडको विभागातून राखीव गाडी मागवा, आमची तक्रार करायची असेल तर करा’ असा उरमट सूर लावल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यानंतर चारवेळा कॉल करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मृतदेह छोट्या टेम्पोमधून नेऊन मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घडामोडीमुळे कुटुंबीय व नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित कर्मचाऱ्यांची बेफिकीरी आणि जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीबद्दल परिसरात संताप व्यक्त होत असून, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे, आतिश पाटील व अक्षय परदेशी यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.
शववाहनाची तातडीची गरज असताना कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा असह्य आहे. याविरोधात तक्रार आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
गोविंद घुगे, सामाजिक कार्यकर्ते, सिडको