

नाशिक : वारंवार नोटिसा बजावून देखील घरपट्टीची थकबाकी भरली जात नसल्यामुळे ७३ बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करून लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. २ ते ४ जुलै दरम्यान सहाही विभागीय कार्यालयांमध्ये ही लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यादृष्टीने संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याच्या सूचना संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. गतवर्षी घरपट्टीतून महापालिकेला २५७ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी मात्र सवलत योजनेचा कालावधी वाढवून देखील करवसुलीचा अपेक्षित आकडा गाठणे कर वसुली विभागाला शक्य होऊ शकलेले नाही. १ एप्रिल ते १९ जून या अडीच महिन्यांच्या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टीत नऊ कोटींची तूट आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीकडे महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी बड्या थकबाकीदारांना महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या.
वारंवार तगादा लावून देखील थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थकबाकीदांच्या मिळकती जप्त करून त्यांच्या लिलावाद्वारे महापालिकेच्या कराची थकबाकी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश कर विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधितांना जाहीर विक्री नोटीस बजावण्याची सूचना देत मिळकतधारकास नोटीस प्राप्त न झाल्यास त्याबाबतची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांची असेल व त्याची जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा उपायुक्त निकत यांनी दिला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७३ बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव दि. २ ते ४ जुलै या कालावधीत विभागीय कार्यालयांच्या प्रभाग समिती सभागृहामध्ये सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत करण्यात येणार आहे.
सिडको : १८
सातपूर : ०९
नाशिक पूर्व : १०
नाशिक पश्चिम : ०८
पंचवटी : १७
नाशिकरोड : १०
लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अनामत म्हणून २५ हजार रूपये मनपाकडे भरावे लागणार आहेत. थकबाकी मालमत्तेसंबंधी कोणत्याही व्यक्तीने गहाण, दान, ताबे गहाण अगर अन्य मार्गाने कोणतेही व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील. तसेच वित्त संस्था वा अन्य संस्थांनी गहाण, दान, ताबेगहाण, हस्तांतरण अगर व्यवहार केला असल्यास थकबाकी असलेला कर भरण्याची जबाबदारी संबंधितांची असेल. थकबाकी एक रक्कमी पूर्ण भरल्यास सदर मिळकतीचा लिलाव रद्द होईल.