

नाशिक : एप्रिलच्या धर्तीवर मे महिन्यात देखील एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या आठ टक्के सवलत दिल्यानंतरही करदात्यांचा प्रतिसाद कमीच असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरपट्टीचा महसुल १३.३२ कोटींनी घटल्याचे समोर आले आहे. कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि देयक वाटपासाठी नियुक्त केलेल्या नव्या ठेकेदाराच्या कामाची संथ गती यामुळे घरपट्टीचा महसूल घटल्याचे सांगितले जाते.
नियमित करदात्यांसाठी महापालिकेतर्फे करसवलत योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत एप्रिलमध्ये एकरकमी घरपट्टी भरणाऱ्यांना आठ टक्के, मे मध्ये पाच टक्के तर जून मध्ये तीन टक्के कर सवलत दिली जाणार होती. एप्रिलमध्ये शासकीय सुट्या मोठ्या प्रमाणावर आल्याने या योजनेला एक महिना मुदतवाढ देत एप्रिलप्रमाणे मे महिन्यातही आठ टक्के करसवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यामुळे महापालिकेच्या घरपट्टीच्या महसुलात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु एकीकडे घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असताना आता करसवलत योजनेचा प्रतिसाद देखील कमी झाल्याचे प्राप्त उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. गतवर्षी १ एप्रिल ते २२ मे या कालावधीत महापालिकेला करसवलत योजनेअंतर्गत ७९.४४ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी या कालावधीत ६६.११ कोटींची घरपट्टी वसुल झाली असून, घरपट्टीच्या महसुलात १३.३२ कोटींची घट झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा नाशिक पश्चिम विभागातून सर्वाधिक ३.८२ कोटी, पंचवटीत ३.४३ कोटी, नाशिक पूर्व २.६६ कोटी, नाशिकरोड २.४३ कोटी, सातपूर १.८५ कोटींची तूट आहे. केवळ नविन नाशिक विभागातून गतवर्षीच्या तुलनेत ८९ लाखांचा महसूल अधिक मिळाला आहे.
विभाग- घरपट्टी(कोटीत)
सातपूर- ७.७६
नाशिक पश्चिम-१२.९५
नाशिक पूर्व- ९.७७
पंचवटी- १०.७६
नवीन नाशिक-१६.५३
नाशिकरोड- ८.३२
एकूण- ६६.११