

नाशिक : अग्निशमन विभागासाठी 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी शिडी अर्थात हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर फिनलॅण्डहून शिडी प्राप्त होण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. दुसरीकडे महापालिकेने यापूर्वी खरेदी केलेल्या 32 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणार्या अग्निशमन शिडीची 15 वर्षांची मुदत संपुष्टात आल्याने ही शिडीही कालबाह्य ठरली आहे.
अग्निशमन विभागाची शिडी कालबाह्य झालेल्या परिस्थितीत दुर्घटना घडल्यास बचावासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अग्निशमन विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन शिडीची व्यवस्था होईपर्यंत जुन्याच शिडीच्या वाहनाला मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे.
15 वर्षांपूर्वी महापालिकेने मोठा गाजावाजा करत 32 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडी खरेदी केली होती. परदेशी बनावटीच्या या शिडी खरेदीवरून त्यावेळी मोठा वादंग उभा राहिला होता. या शिडीच्या देखभाल - दुरुस्ती व संचलनाविषयी अनेक प्रश्न तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी शहरात एकही 32 मीटर उंच इमारत नव्हती. त्यामुळे या शिडीसाठी कोट्यवधींचा खर्च कशासाठी असाही प्रश्न उपस्थित केला गेला होता. विरोध झुगारून तत्कालीन सत्ताधार्यांनी या अग्निशमन शिडी खरेदीला मंजुरी दिली. परदेशातून नाशिकमध्ये हे वाहन येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यानंतर काही वर्षे हे यंत्र वापराविना पडून राहिले. त्यामुळे आरोपांना पुष्टी मिळाली होती. सुरुवातीला झाडांवर मांजात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, उंच इमारतीतील दरवाजे लॉक झालेल्या सदनिकांमधील नागरिकांना बाहेर काढणे यांसारख्या कामांसाठी या शिडीचा वापर झाला. शहराचा विस्तार जसजसा वाढू लागला तसतसे या यंत्राचे महत्त्व सर्वांनाच कळून चुकले. 1 जानेवारी 2023 मध्ये गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत या अग्निशमन शिडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यंत्रामुळे पाच ते सहा कामगारांचे जीव वाचू शकले. दि. 21 ऑगस्ट 2008 रोजी या वाहनाची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली होती. 28 जुलै 2023 रोजी या वाहनाची प्रादेशिक परिवहन विभागाकडे फिटनेस करण्यात आली. त्यात या वाहनाला 2024 मध्ये 15 वर्षे पूर्ण होत असल्याने या वाहनाची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून महापालिकेला कळविण्यात आले होते.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडी खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली होती. फिनलॅण्ड येथील मक्तेदार कंपनीकडून शिडी खरेदीचा व्यवहारही झाला होता. परंतु, संबंधित कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे महापालिकेने निविदाप्रक्रिया रद्द करत नव्याने प्रक्रिया राबविली. आता नवीन शिडी येण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र यापूर्वी खरेदी केलेली 32 मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारी अग्निशमन शिडीची मुदत संपुष्टात आली आहे.