

नाशिक : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर मंगळवार (दि.17) पासून अचानक आठवडाभरासाठी रजेवर गेले आहेत. ते वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याची माहिती आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, अधिवेशनानंतर डॉ. करंजकर यांच्या बदलीचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपुरात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनकाळात अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबण्याचे सरकारचे निर्देश आहेत. मात्र डॉ. करंजकर मंगळवारी (दी.17) अचानक रजेवर गेल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. प्रकृती अस्वस्थामुळे डॉ. करंजकर यांनी रजा घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील अनागोंदी कारभार सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. डॉ. करंजकर यांची मवाळ भूमिका त्यांची प्रशासनावरील पकड सैल करणारी ठरली आहे. त्यातूनच अधिकाऱ्यांकडून अनेक गैरप्रकार महापालिकेत सुरू आहेत.
55 कोटींचे वादग्रस्त भूसंपादन प्रकरण, विशिष्ट ठेकेदारालाच ठेका मिळावा यासाठी 176 कोटींच्या सफाई कर्मचारी ठेक्याच्या निविदा प्रक्रियेत करण्यात आलेले बदल, असे अनेक प्रकार महापालिकेत सुरू आहेत. यामुळे महापालिकेची इभ्रत वेशीवर टांगली गेली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सत्तारूढ भाजपच्या तिन्ही आमदारांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या आहेत. महापालिकेत थेट आयएएस दर्जाचा आयुक्त नेमण्याची मागणी होत आहे. त्यातच आयुक्त डॉ. करंजकर हे देखील बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. ते नाशिकमध्ये काम करण्यास इच्छूक नसल्याचा दावा काही अधिकारी खासगीत करत आहेत. नवीन सरकार आल्यानंतर तात्काळ आपली बदली होईल अशी अपेक्षा डॉ. करंजकर यांची होती. परंतु, अद्यापही त्यांच्या बदलीचे आदेश निघत नसल्यामुळे ते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आता ते रजेवर गेल्याने बदलीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
आयुक्त डॉ. करंजकर यांच्या बदलीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या बदलीसाठी यापूर्वी राज्यपालांना निवेदन सादर केले होते. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भाजप शिष्टमंडळाने भेट घेत आयुक्तांच्या बदलीची मागणी केल्याचे शहराध्यक्ष जाधव यांनी सांगितले.