

नाशिक : वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी झालेली बदली अवघ्या काही तासांत राजकीय दबावानंतर रद्द झाली. आता नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri ) यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली. कर्डिले यांना सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. (Manisha Khatri appointed as Nashik NMC Commissioner)
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या बदलीची चर्चा अखेर खरी ठरली. गेल्या आठवडाभरापासून रजेवर असलेल्या डॉ. करंजकर यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी धडकले. सुरुवातीला नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पदभार सोपविला गेला. परंतु, त्यानंतर काही वेळांतच सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले.
वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे आदेश या पत्रात नमूद होते. कर्डिले हे मसुरी येथे ट्रेनिंगसाठी असल्याने ३० डिसेंबरला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, आयुक्तपदी कर्डिले यांच्या नियुक्तीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे नाराज होते. त्यांच्या नाराजीची दखल घेत अवघ्या काही तासांतच आयुक्तपदाच्या बदलीच्या आदेशात फेरबदल करण्यात आले. कर्डिले यांच्याऐवजी नाशिक महानगर विकास प्राधिकरण विभागाच्या आयुक्त खत्री यांच्याकडेच आयुक्तपदाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. कर्डिले यांची बदली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.
कर्डिले हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. ते महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी येणार होते. त्यामुळे नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) आयुक्तांचे वाहन त्यांना आणण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, आयुक्तांच्या बदलीच्या आदेशात फेरबदल करण्यात आल्यानंतर कर्डिले यांना घेण्यासाठी निघालेले वाहन समृद्धी महामार्गावरूनच माघारी फिरले.
मंत्री गिरीश महाजन यांचा राज्यातील महायुतीच्या सत्तेतील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कर्डिले यांच्या आयुक्तपदावरील बदलीने महाजन नाराज होते. खत्री यांची आयुक्तपदी वर्णी लागावी, अशी त्यांची इच्छा होती. अखेर महाजन यांनी बाजी मारली. आयुक्त नियुक्तीच्या आदेशात फेरबदल करत खत्री यांची आयुक्तपदी नियुक्ती केली गेली.