

नाशिक : घरपट्टीच्या थकबाकीदारांसाठी महापालिकेने लागू केलेल्या अभय योजनेला गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७० हजार ५८९ थकबाकीदारांनी प्रतिसाद दिला आहे. या थकबाकीदारांनी ५५.५० कोटींची थकबाकी भरत २०.१८ कोटींची दंडमाफी मिळवली आहे. अभय योजनेतील ९५ टक्के सवलतीची मुदत संपुष्टात आली असून, आता ३१ डिसेंबरपर्यंत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या मिळकतधारकांना दंडाच्या रकमेत ८५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
नाशिक शहरात सहा लाख मिळकतींची महापालिका सदरी नोंद आहे. कर आकारणी विभागांतर्गत सहाही विभागीय कार्यालयांमार्फत या मिळकती तसेच जमिनींवर घरपट्टी आकारणी केली जाते. निर्धारित कालावधीत घरपट्टी न भरल्यास दरमहा दोन टक्के शास्ती केली जाते. त्याचप्रमाणे जे मिळकतधारक, भोगवटादार घरपट्टीची थकबाकी भरणार नाही, अशा थकबाकीदार मिळकतधारकांना कायद्यातील तरतुदींनुसार वॉरंट, नोटिसा बजावून मिळकत जप्तीची, लिलावाची कारवाई केली जाते. त्यासाठी वॉरंट फी, नोटीस फी तसेच सरकारी वॉरंट फी व नोटीस फीदेखील आकारणी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून घरपट्टीच्या थकबाकीच्या रकमेत वाढ होत आहे.
प्रतिवर्षी शास्तीच्या रकमेत होणारी वाढ थकबाकीचा डोंगर निर्माण करणारी ठरली आहे. घरपट्टीची थकबाकी तब्बल ७५२ कोटींवर पोहोचली असून, त्यात ३४८ कोटी केवळ शास्तीची रक्कम आहे. या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने १ सप्टेंबरपासून अभय योजना लागू केली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत शास्तीच्या रकमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली गेली.
पंचवटी, सिडकोतून सर्वाधिक प्रतिसाद
शहरातील पंचवटी, सिडको तसेच नाशिक पूर्व विभागात थकबाकीदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दंडमाफी मिळविण्यासाठी या विभागांतून मिळणारा प्रतिसादही अन्य विभागांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या तीन महिन्यांत पंचवटीतून सर्वाधिक १७,९४५, सिडकोतून १५,३३७ तर नाशिक पूर्व विभागातून १२,२१० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. नाशिकरोडमधून १०,१४८, सातपूर ९०७७ तर नाशिक पश्चिम विभागातून ५८७२ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत घरपट्टीची थकबाकी भरली आहे.