

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएसमधील धर्मांतर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निदा खान हिच्या वैवाहिक आयुष्यातील वाद अद्यापही कायम आहे. निदा खानचा पती मोईन नाविद खान याने घटस्फोटाच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली असून, शुक्रवारी (दि.२०) कौटुंबिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिगंद्वारे झालेल्या दुसऱ्या समुपदेशनातूनही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता याप्रकरणी १९ जानेवारी २०२७ रोजी पुढील आणि अंतिम समुपदेशन होणार आहे.
निदा खान हिच्याविरोधात तिच्या पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. टीसीएस प्रकरण समोर आल्यानंतर कुटुंबाला सामाजिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पतीने समुपदेशनादरम्यान मांडल्याचे वृत्त आहे. तसेच वैवाहिक संबंधांमध्ये यापूर्वीपासूनच मतभेद असल्याची भूमिकाही त्याने घेतल्याचे समजते. त्यामुळे दोघांच्या भूमिकांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही.
न्यायालयाच्या माध्यमातून समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही समुपदेशनांतून सकारात्मक निष्पत्ती झालेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात १९ जानेवारी रोजी तिसरे समुपदेशन होणार आहे. या बैठकीतही तडजोड न झाल्यास घटस्फोटाच्या याचिकेवर नियमित न्यायालयीन सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.