

नाशिक : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणी बैठक शुक्रवारी (दि. 25) साई मंदिर हाॅल करवीरनगर दहिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.
संघटनेचे मार्गदर्शक आमदार संजय केळकर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर राहणार असून कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती आयोजक व्यवस्थापन समिती सदस्य संजय पावसे व दत्तात्रय घाडगे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही वृत्तपत्र विक्रेता-एजंट यांच्यासाठी काम करणारी शिखर संघटना आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचा सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यरत व्हावे व स्थापन होण्यासाठी संघटनेने पंधरा वर्षे प्रयत्न केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळास मान्यता दिली आहे. दरम्यान, जाहीर केलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तातडीने कार्यरत करावे, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टाॅलला संरक्षण मिळावे, मोक्याच्या ठिकाणी गटई कामगारांप्रमाणे स्टाॅल मिळावेत आदी मागण्यांबाबत चर्चा करून पुढील दिशा-धोरण या बैठकीत ठरवले जाणार आहे. या बैठकीस राज्य संघटनेचे सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य, सलग्न सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिव उपस्थित राहणार आहेत.