

नाशिक : न्यूजपेपर एजन्सी चालवणे, वृतपत्र वाटपाचे क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. महिलांही या व्यवसायात उतरल्या असून घराला आर्थिक हातभार लावत आहेत. काही महिला स्वत: वृतपत्रांचे वापट करुन अध्यापनाचेही कार्य करतात तर काही संसारला आर्थिक पाठबळ लाभावे, मुलांचे संगोपन, संस्कार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनही अन्य नोकरीच्या वाटा नाकारुन या क्षेत्रात उतरल्या आहेत. वृतपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने अशाच काही प्रेरणादायी कहानींचे 'यशोवृत्त'!
सासुबाईंची प्रेरणा - माझ्या पतीची वृत्तपत्र एजन्सी. ते नोकरीला लागल्यानंतर सासुबाई मंगला दळवी यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून दहा वर्षांहून अधिक वर्ष काम केले. त्या आजारी पडल्यानंतर मी व्यवसायात उतरले. सकाळी साडेचार वाजता दिनक्रम सुरु होते. वृतपत्र वाटपासाठी आमच्या एक मुलगा काम करतो. मीदेखील सिडकोत पेपर वाटप करुन नंतर शिक्षिका म्हणून अध्यापनासाठी सज्ज होेते. पावसाळ्याच चार महिने वृत्तपत्र वाटप अत्यंत आव्हानात्मक कार्य होऊन जाते. यंदा जास्तिच्या पावसाने अधिकच कष्टप्रद अनुभव आले. वेळेचे नियोजन यासाठी अत्यंत काटेकोरपणे करत असते. गणेश चाैक, स्टेट बँक कॉलनी, राणाप्रताप चौक, बाजीप्रभू चौक आदी परिसर मी पूर्ण करते. शाळेला उशिर झाला तर वेतन कपात होते. त्यामुळे काटेकोर नियाेजनातून वृत्रपत्र वाटप आणि अध्यापनाचे कार्य करते. सासुबाई दिवगंत मंगला दळवी यांनी पायी एकट्याने वृत्तपत्र वाटपाचे कार्य केले त्यांनी केलेल्या संचितावर माझे कार्य सुलभ झाले आहे. आज व्यवसायात स्थिरावले आहे. स्वत:ची ओळख आणि अस्तित्वही मिळाले आहे.
स्वाती रविंद्र दळवी, श्री गुरुदेव दत्त् एजन्सी, सिडको.
मुलांवर, संस्कार, संगोपन महत्वाचे! - राेज पहाटे ३.३० दिनक्रम सुरु होतोे. सव्वाचार वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. गावात एमजी रोड आदी ठिकांणाहून दिवसांची सुरुवात हाेते. नंतर खुटवट नगर येथील स्टॉलवर जात काउंटरवर वृतपत्र लावण्यासाठी वेळ देते. त्यानंतर प्रत्येकांच्या घरात वृत्रपत्र वेळेवर वाटप व्हावा यासाठी नियोजन करुन स्वत: पेपर वाटप करतेे. वृतपत्र वाटपासाठी बाहेरची मुले घेतली नाहीत. माझी दोन्ही मुले याकामात मदत करतात. लहान मुलगा ९० घरांमध्ये पेपर वाटपाचे काम करतो तर मोठा चिरंजीव दहावीचा अभ्यास करुन या कामी मदत करतो. या कामामुळे दोन्ही मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत नाही, यासाठी दक्ष राहते. माझी मुले वृत्रपत्रे वाटप करुन त्याचे वाचन करुन समृद्ध व्यक्तीमत्वासाठी प्रयत्न करताना पाहते तेव्हा विलक्षण समाधान होते. वडिलांनी २७ वर्ष वृत्तपत्र एजन्सीतून काम केले. त्यांचे कष्ट प्रेरणा देतात. पूर्णवेळ नोकरी करुनही अर्थाजन करता येते, मात्र मुलांवर संस्कार करण्यासाठी मी हेच क्षेत्र निवडले. आज मुलांचा अभ्यास, संस्कार करण्यासह व्यवसायातून अर्थाजन होत असून मी समाधनी आहे.
ज्याेती मनिष जगताप, ज्योती एजन्सी, खुटवड नगर.
कुटुंब रंगले 'व्यवसायात' - पती गेल्या २५ वर्षांपासून वृतपत्र एजन्सी चालवत आहे. मी देखील २० वर्षापासून पेपरलाईन मध्ये पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करते. दोन्ही मुलेही वृतपत्र वाटपाचे काम मनापासून करत आहे. संपूर्ण कुंटुंबच याच व्यवसायत असल्याने हे आमच्या परिवारत अगदीच सरावाचे काम झाले आहे. पहाटे चारवाजता उठून दिनक्रमाला सुरुवात करते. पती वृत्रपत्राचे गठ्ठे गावातून घेऊन सातपूरयेथील शिवाजीनगर येथे येतात. कुठल्या भागात वृतपत्र टाकायचे याचे 'लाईन' काढून दोन्ही मुलांना वृतपत्रांचे गठ्ठे काढून देते. मुलीने एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले असून उच्चशिक्षित असूनही ती वृतपत्रांचे वाटप अगदी तन्मनतेने करते. लहान मुलगा नॉनमॅट्रिक असून तोही मनापासून दिलेली लाईन सांभाळतो. दोन दशकांपासून या व्यवसायात असून कामाचे अत्यंतिक समाधान आहे. मुलांनाही वृतपत्र वाटपासह वाचनातून चालु घडामोडी, बातम्या याचे ज्ञान होते. पावसे 'कुंटुब रंगलयं' वृतपत्र व्यवसायात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कामातून पतीला, घराला आधार देता येतो याचे समाधान आहे.
अनिता शरद पावसे, देवी एजन्सी, शिवाजीनगर, सातपूर.