

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका मुख्यालयासमोरील शरणपूर रोड ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याचे काँक्रीटकरण होऊन अवघे तीन-चार महिने झाले. वर्षभर नागरिकांना वेठीस धरून बंद ठेवलेला रस्ता नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला.
मात्र, नागरिकांना दिलासा मिळण्याआधीच 'स्मार्ट सिटी'च्या माध्यमातून बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ओएफसी केबल टाकण्यासाठी हाच नवा कोरा काँक्रीट रस्ता पुन्हा फोडण्याचा प्रताप समोर आला आहे. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी रस्ता खोदण्याचे काम तत्काळ बंद पाडत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
या प्रकाराने 'विकासकामे नेमकी कोणासाठी आणि कोणाच्या नियोजनाने?' असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महासभेत एमएनजीएलसह स्मार्ट सिटी कंपनीला बारेवर धरण्यात आले. महासभेला एक दिवस उलटत नाही तोच स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ओएफसी केबलकरिता चेंबर करण्यासाठी रस्ता फोडला जात असल्याची माहिती सोमवारी नगरसेविका डॉ. पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत काम रोखले. धक्कादायक बाब म्हणजे काम सुरू असताना घटनास्थळी स्मार्ट सिटी अथवा महापालिकेचा एकही अभियंता उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.
कामगार धुळ्याहून आल्याची माहितीही समोर आली आहे. रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी सीसीटीव्ही चेंबर, केबल आणि अन्य सुविधांचे नियोजन का झाले नाही? स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा पूर्ण अभाव आहे का? चार महिन्यांतच नव्याने केलेला रस्ता फोडण्याची वेळ का आली? पुन्हा रस्ता दुरुस्त करण्याचा खर्च नागरिकांच्या खिशातूनच जाणार का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत नगरसेविका डॉ. पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
"एकीकडे रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे काही महिन्यांतच तेच रस्ते पुन्हा खोदायचे, हा प्रकार म्हणजे विकासाचा नमुना की सार्वजनिक पैशांची उधळपट्टी? या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रस्ता फोडण्यासंदर्भातील परवानग्या तपासाव्यात. लेखी परवानगीशिवाय काम तातडीने थांबवावे आणि फोडलेला काँक्रीट रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावा."
— डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १२