

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष केला जातो. त्यावेळी अनेकांकडून सेलिब्रेशन केले जाते. त्यात मद्यसेवन, मांसाहार मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यानंतर मद्यपींकडून अपघात, घातपात होण्याची शक्यता असल्याने शहर व ग्रामीण पोलिस सतर्क झाले आहेत. ओल्या पार्ट्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, विनापरवानगी पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
सरत्या वर्षातील आठवणींची शिदोरी सोबत घेत सर्व नववर्षात पदार्पण करणार आहेत. त्यावेळी बहुतांश नागरिक 31 डिसेंबरला जल्लोषात जागवतात. त्यासाठी नातलग, मित्रपरिवारांसह पार्टीस जाणे, बाहेरगावी फिरण्यास जाणे, मद्यसेवन करणे असे बेत आखले जातात. नाशिक शहरासह ग्रामीणमध्येही जल्लोष साजरा करणाऱ्यांची गर्दी असते. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, चांदशीसह ग्रामीण भागातील रिसॉर्ट, हॉटेल्स व फार्म हाउस बुकिंगला सुरुवात झाली आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलिस ठाणेनिहाय तसेच स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तसेच साध्या वेशातील पोलिसांमार्फत पार्ट्यांवर, जल्लोषावर लक्ष ठेवले जाणार आहे. तर शहर पोलिसांनी वाहन तपासणीवर भर दिला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार बेशिस्त चालकांवर कारवाई केली जात आहे. तसेच पोलिस ठाणेनिहाय हॉटेल, बार, रेस्टॉरंट, कॅफेचालकांना सूचना दिल्या असून, रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी केली जात आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमही शहरात राबवली जाणार असून, शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे.
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपींसह संशयितांची तपासणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण