

नाशिक : नववर्ष स्वागतासाठी नाशिककर शहराजवळील रिसॉर्ट, पर्यटनस्थळे आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये मौजमजा, डान्स, गायन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.31) अनेकांनी नववर्षासाठी विशेष बेत आखले आहेत. क्लब, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये म्युझिक डान्स, गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी नाशिककर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.
काही जण गर्दी, कोलाहलापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणच्या रिसॉर्टना पसंती देत आहेत. गंगापूर बॅकवॉटरजवळील हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंटमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी बेत आखले आहेत. तरुणाई आपल्या मित्रांसह जवळील पर्यटनस्थळी जाऊन नववर्ष स्वागतासाठी सज्ज आहे. काही हाउसिंग सोसायट्या आपल्याच परिसरात मध्यरात्री
12 वाजता नववर्षाचे स्वागत करणार आहेत. त्यासाठी सोसायट्यांमधील कम्युनिटी हॉल अथवा टेरेसवर संकल्पनांवर आधारित खेळ, नाचगाणी करत सहपरिवार मेजवानी आयोजित करत आहेत.
नववर्षाच्या स्वागताला 1 तारखेच्या पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आल्याने व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, अनेक हॉटेल्समध्ये रोषणाई करण्यात आली आहे. हुरडा पार्टीचा हंगाम आणि नाशिकच्या आसपास अनेक कृषी पर्यटन केंद्रे यामुळे अनेक जण ग्रामीण चवीच्या जेवणासाठी, अनेकांनी हुरडा पार्टी केंद्रांवर नववर्षाचे स्वागत करण्याचे बेत आखले आहेत.
अनेक परिवार देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करत असतात. त्यामुळे काही नाशिककरांनी वणी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी अशा धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देवदर्शनाने नववर्ष स्वागताचे बेत आखले आहेत.
नाशिककर विविध ठिकाणी नववर्षाचे स्वागत करणार असले, तरी नाशिकमधील तरुणाईला गंगापूर रोड- कॉलेज रोडवरील फास्ट फूड सेंटर, स्ट्रीट फूड आणि तत्सम हॉटेलची ‘क्रेझ’ कायम असणार आहे. बाइक काढून मित्र-मैत्रिणींसह अनेकांनी याच भागात नववर्षाचे स्वागताचे बेत आखले आहेत. त्यामुळे या भागातील छोटे- मोठे हॉटेलसह सजले आहेत.
पेठ, दिंडोरी रोडवरील हॉटेल्स, ढाबे, गंगापूर गाव आणि धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील तसेच कश्यपी धरणाजवळील रेस्टॉरंट, रिसॉर्ट नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. मखमलाबाद रोड, गिरणारे, ओझर, त्र्यंबक रोड जवळील रिसॉर्ट तसेच कृषी पर्यटन केंद्रांवर रोषणाईसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध मेनू ठेवण्यात आले आहेत. गिरणारे परिसरातील काही हेल्थ रिसॉर्टवर तर 15 दिवस आधी बुकिंग करण्यात आले आहे.