

नाशिक : सतीश डोंगरे
बेभरवशाचा मौल्यवान धातू म्हणून चांदीकडे बघितले जात असले तरी २०२५ हे चांदीसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. या वर्षात चांदीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढताना नव्या वर्षातही चांदी विक्रमाचे एक एक इमले चढतच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. चांदी दरवाढीचा वेग बघता नव्या वर्षात चांदी चार लाखांचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज आता वर्तविला जात आहे. चांदीने २०२५ या वर्षात तब्बल १ लाख ६६ हजार ३२२ रुपयांची विक्रमी वाढ नोंदविली आहे.
एक जानेवारी २०२५ रोजी चांदी प्रतिकिलो जीएसटीसह ८७ हजार ५७८ रुपयांवर होती. प्रारंभी चांदी दरवाढीचा वेग फारसा नव्हता. मात्र, जून २०२५ पासून चांदीने दरवाढीचा पकडलेला वेग थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. १७ जून २०२५ रोजी चांदीने एक लाखाचा टप्पा पार केला. त्यानंतर दसरा-दिवाळीअगोदरच म्हणजेच ३० सप्टेंबर २०२५ रोजी चांदी एक लाख ५१ हजारांवर होती. पुढे दिवाळीच्या मुहूर्तावर 13 ते 15 ऑक्टोबरदरम्यान चांदीने १ लाख ८५ हजारांचा आकडा पार केला. नोव्हेंबर महिन्यात चांदी दरवाढीचा वेग कायम असल्याने चांदी दोन लाखांच्या नजीक पोहोचली. डिसेंबरमध्ये चांदीने दोन लाखांचा टप्पा पार केलाच; शिवाय डिसेंबरअखेरीस अडीच लाखांचा स्तर गाठला. १९७९ नंतर प्रथमच ४६ वर्षांमधील दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढत एका वर्षात तब्बल १२५ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली आहे.
चांदीचा वापर अनेक कारणांसाठी वाढला आहे. वर्षभरात चांदीच्या मागणीत २५ टक्क्यांची अतिरिक्त वाढ झाली आहे. तुलनेत पुरवठा कमी असल्याने त्याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे. दरम्यान, चांदीतील तेजीने गुंतवणूकदारांना मालमाल केले असून दरवाढ बघता चांदीतील गुंतवणूक वाढतच आहे. २०२६ हे वर्ष चांदीसाठी विक्रमी ठरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सोने दोन लाख पार? सोने दरवाढीचाही वेग विक्रमी आहे. सध्या सोने दीड लाखाच्या दिशेने आगेकूच करीत असून नव्या वर्षात दोन लाख पार करेल, असा अंदाज आहे. १ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७६ हजार ५३४ रुपयांवर होते. हा दर २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रतितोळा १ लाख ४३ हजार ४८० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीप्रमाणे सोने दरवाढीचा वेग नसला तरी, सोने नव्या वर्षात दोन लाख पार करण्याचा अंदाज आहे.
१ जानेवारी २०२५ रोजीचा दर
८७ हजार ५८७ रु.
२७ डिसेंबर २०२५ रोजीचा दर
१ लाख ६६ हजार ३२२ रु. (दर किलोमध्ये जीएसटीसह)
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने पुढील काळात चांदी मिळणार नाही. त्यामुळे प्रीमियम वाढून चांदीचे भाव आणखी वाढतील. नव्या वर्षात चांदी कमीत कमी साडेतीन लाख, तर जास्तीत सात लाखांपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. सध्या चांदीची निर्यात बंद केली आहे. चांदीचे उत्पादनही ४० टक्क्यांनी घटले आहे. अशात चांदी बुकिंग करूनच खरेदी करावी लागणार आहे. चांदी भविष्यातील सोने आहे.
चेतन राजापूरकर, संचालक, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन