

नाशिक : आजचे हे प्रशिक्षण केवळ अध्यापन पद्धती सुधारण्यापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना इंग्रजी संप्रेषण कौशल्य प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. मविप्रच्या ओझरमिग येथील होरायझन अकॅडमीमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती डी. बी. मोगल, निफाड तालुक्याचे संचालक शिवाजी गडाख, शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल आदी उपस्थित होते. इंग्रजी अध्यापन अधिक आकर्षक, विद्यार्थी-अनुकूल व भविष्याभिमुख करणे व्याकरण आणि शब्दसंग्रह वाढविणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका मीरा पांडे यांनी सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शरद बिन्नोर, डॉ. प्रणाली जाधव, वैशाली रणदिवे, अनिल बच्चाटे, डॉ. अश्विनी कदम, डॉ. सोनिया बैरागी, अजित रकिबे आणि जयश्री गोवर्धने यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत एकूण ९५ शिक्षकांनी सहभाग घेतला.