

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 19 परीक्षा केंद्रांवर रविवारी (दि. ४) वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट युजी 2025) पार पडली. 10 हजार 378 विद्यार्थ्यांपैकी एकूण 10 हजार 120 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 258 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती नीटचे समन्वयक दीपक अहिरे यांनी दिली. १४ जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते. यंदा देशभरातून सुमारे 5453 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातून सुमारे 22 लाख विद्यार्थी नीट परीक्षेस बसले होते. दुपारी दोन ते पाच दरम्यान पेपर घेण्यात आला. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायलॉजी या तीन विषयांचा एकत्रित पेपर घेण्यात आला. परीक्षा केंद्रावर एनटीएची (नॅशनल टेस्टींग एजन्सी) करडी नजर होती. अॅडमिट कार्ड आणि वेब फोटो ओळखपत्राशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेशाला बंदी घालण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर एक तास अगोदर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. 180 प्रश्नांसाठी 180 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. मागच्यावेळी झालेल्या गैरप्रकारामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात आल्याने यंदा गैरप्रकाराला आळा बसल्याचे दिसून आले.
नाशिकमधील वडनेर येथील केंद्रीय विद्यालयात दोन विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर दीड वाजेनंतर म्हणजेच निर्धारित वेळेच्या काही मिनिटांनी केंद्रावर दाखल झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षेची वेळ दुपारी 2 वाजेची असली तरी, सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान 1.30 वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक असल्याचे सूचना पत्रकात नमूद करण्यात आले होते. परीक्षेचे राष्ट्रीय नियम अत्यंत कठोर असल्याने त्यांना परीक्षा द्यायची परवानगीना कारण्यात आली.
नाशिकच्या मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब झाल्याचे दिसून आले. बायोमेट्रिकसाठी तांत्रिक अडचणीत येत होत्या. यामुळे परीक्षा केंद्रावर सुमारे एक तास विद्यार्थी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. बायोमेट्रिकचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.