देवळाली कॅम्प (नाशिक) : ब्रिटिशांनी देवळाली शहराची निर्मिती करताना विविध सुविधा उभारल्या. परंतु काळानुसार त्या बंद झाल्याने, शहराचा विकास करताना टाउन प्लॅनिंग नसल्याने जमेल त्याप्रकारे विविध योजना सध्याचे प्रशासन राबवत आहेत. त्यातच कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण महापालिका अथवा लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असून, अन्य शहरांप्रमाणे या शहरांचे टाउन प्लॅनिंग होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देवळालीचे टाउन प्लॅनिंग दहा वर्षांतून फाइलबंद
ब्रिटिशकालीन शहराच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष
2014 पासून बोर्डाच्या प्रयत्नांना यश नाही
स्मार्ट सिटीच्या संकल्पना कशा पूर्ण होणार
संपूर्ण देशात देवळालीची ओळख स्वच्छ व सुंदर शहर म्हणून आहे. येथील हवामान अतिशय निरोगी असल्याने विविध जातीधर्मांचे सॅनोटोरियम येथे वसलेले आहेत. २०१४ मध्ये तत्कालीन बोर्डाने टाउन प्लॅनिंगचा ठराव करून तसा प्रस्ताव दिल्ली दरबारी पाठविलेला आहे. परंतु तेव्हापासून हा प्रस्ताव सरकार दरबारी फायलीतच पडून आहे.
देवळाली कॅम्पची लोकसंख्या 70 ते 80 हजारांपर्यंत पोहोचली असून, त्या दृष्टिकोनातून नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना असे कोणतेही प्लॅनिंग झालेले नाही. त्याचा परिणाम अनेक नागरिक सुविधांवर होत आहे.
देवळाली कॅम्पला दारणेतून पाणीपुरवठा होतो. या कामी बोर्डाने 25 वर्षांपूर्वी टाकलेली जलवाहिनी आज अपूर्ण पडत आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चार ठिकाणी जलकुंभ उभारले आहेत. मात्र, 25 वर्षांपूर्वीची लोकसंख्या व आजची लोकसंख्या यात मोठा फरक पडला असून, वाॅर्ड क्रमांक 4 तसेच 8 येथे दररोज अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
टाऊन प्लॅनिंगअभावी मुख्य रस्ते कोणते व उपरस्ते कोणते याचा उलगडा होत नसल्याने जसा निधी उपलब्ध होईल, तसा खर्च करून तात्पुरत्या स्वरूपात रस्ते दुरुस्त केले जात आहेत. मात्र, या रस्त्यांमुळे नागरिकांची सोय होते की, गैरसोय याचा कुठेही विचार केला जात नाही. अनेक रस्ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून तयार केले जातात. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रशासन याबाबत कोठेही पुढाकार घेत नाही.
देवळाली शहर हे खेळाडूंची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, येथील युवकांना आनंद रोड मैदान वगळता एकही मैदान उपलब्ध नाही. शिवाय कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल हे दानशूरांच्या मदतीवर चालू असून, याबाबत सरकारचे कोणतेही मदतीचे धोरण नाही. शाळांबाबतदेखील अशीच परिस्थिती असून, केवळ नियोजनाअभावी या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
देवळालीची बाजारपेठ ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून, बाहेरून येणाऱ्या ग्राहकांसाठी शहरात पार्किंगची योग्य अशी सुविधा नाही. शिवाय सार्वजनिक शौचालयाचा अभाव हा मोठा प्रश्न बाहेरील नागरिकांना सतावत असतो. बाजारपेठेतील दुकानांतील कामगारांना या असुविधांना तोंड द्यावे लागत आहे.
येथील रविवारचा आठवडे बाजार हा शहरासह तीन तालुक्यांतील 28 गावांची बाजारपेठ आहे. मात्र, या बाजारपेठेत ग्राहक, व्यापारी व शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक नागरिक या बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहेत. वास्तविक स्वस्त व किफायतशीर माल मिळण्याचे ठिकाण म्हणून देवळालीचा उल्लेख केला जातो. केवळ टाउन प्लॅनिंग नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ब्रिटिश काळापासून मोकाट जनावरांसाठी कॅन्टोन्मेंटमध्ये कोंडवाड्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, सध्या याकडे दुर्लक्ष होत असून, नागरिकांना मोकाट जनावरांचा मोठा त्रास होत असतानाही प्रशासन मात्र लक्ष देत नाही. केवळ कोणत्याही गोष्टीचे प्लॅनिंग नसल्याने आज जनावरांचा कोंडवाडा असूनही त्याची उपयुक्तता दिसून येत नाही.
शहरातील सर्व वाॅर्डांमध्ये काही प्रमाणावर मागासवर्गीय यांच्या वस्त्या असून, त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे असताना केवळ टाउन प्लॅनिंगअभावी अशा बाबी पूर्ण होत नाही.
देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंटचा समावेश असून, मोठा नावलौकिक असलेल्या या शहराला टाउन प्लॅनिंगअभावी फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी अनेकदा प्रयत्न करूनही अद्यापही शहराचे टाउन प्लॅनिंग पूर्णत्वास गेलेले नाही. बोर्डाचे विलीनीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करताना टाउन प्लॅनिंगसाठीच्या गोष्टींची पूर्तता केल्यास अनेक नागरी सुविधा उपलब्ध होतील
सुरेश निकम, शहराध्यक्ष, रिपाई