

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज परतफेड सामोपचार योजनेला थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दीड महिन्यात या योजनेतून बँकेला साडेतेरा कोटींची वसुली झाली आहे. यात दिंडोरी, निफाड या दोन सधन तालुक्यांसह मालेगाव व येवला या दुष्काळग्रस्त तालुक्यांतून थकबाकीदांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे.
जिल्हा बॅंकेची तब्बल 2300 कोटींहून अधिक थकबाकी आहे. शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसले आहे. शेतकऱी संघटनेने कर्जमाफीसाठी रेटा लावला आहे. संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे समान हप्ते करून द्यावे अशी आग्रही मागणी संघटनांनी लावून धरली आहे. असे असले तरी, दुसरीकडे जिल्हा बॅंक अडचणीत असल्याने वसुलीवर भर देत असून, बॅंकेने नवीन सामोपचार योजना2 आॅगस्ट रोजी लागू केली आहे. ही योजना थकबाकीदारांपर्यंत पोहचण्यासाठी महिनाभरापासून 450 अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरले असून गावो-गावी, वाडया-वस्त्यांवर थकबाकीदारांच्या घरोघरी पोहचले आहे. पहिल्या टप्यात 40 हजार थकबाकीदारांना थकीत हिशोबाचे विनंतीपत्र पोहच करत, या माध्यमातून थकबाकी भरण्याचे आवाहन थकबाकीदारांना केले. तसेच जिल्हा बँकेने विशेष सभेत मयत सभासदांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून अशा ८ हजार १७१ मयत सभासदांकडे १३७ कोटींचे कर्ज थकीत आहे. सामोपचार योजनेतून आतापर्यंत ९२९ सभासदांनी १३ कोटी ५९ लाख २० हजारांचे कर्ज भरले आहे. ऐन पावसाळ्यात कर्जवसूली सुरु झाल्याने या योजनेला काहीसा थंडा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, येत्या काळात बँकेची वसूली अधिक गतीने होण्याची शक्यता आहे. या योजनेतून बँकेला ५९१ कोटी ८२ लाखांची कर्जवसूली मिळणे अपेक्षित आहे.
तालुकानिहाय झालेला वसुली (चौक)
दिंडोरी (२.२ कोटी), निफाड (२.१३ कोटी), मालेगाव(२.२० कोटी) , येवला (१.५२ कोटी), सटाणा (१.४८ कोटी), कळवण (१.०१ कोटी), सिन्नर(१.३१ कोटी), चांदवड (१० लाख), नांदगाव (५५ लाख), नाशिक (००), देवळा (७३ लाख), त्र्यंबकेश्वर (३८ लाख), इगतपुरी (६.८६ लाख), पेठ (२.५५ लाख), सुरगाणा (२.९६ लाख).......एकूण (१३ कोटी ५९ लाख २० हजार).
-----------जिल्हा बॅंकेचा लोगो