नाशिक : नवरात्रोत्सवासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील कालिकादेवी आणि रेणुकादेवी यात्रेत मंदिरासमोरील जागेत तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. तसेच गर्दीतील भुरट्या चोऱ्यां करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त तैनात राहणार आहे.
शहर पोलिसांनी नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांना सशर्त परवानग्या दिल्या आहेत. प्रत्येक मंडळासह देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही अनिवार्य आहे. यात्रोत्सवासह गरबा व दांडिया कार्यक्रमांवरही सीसीटीव्हीचा पहारा राहणार आहे. यासह प्रत्येक मंडळाजवळ पोलिस अंमलदार आणि होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच डीजे आणि लेझरचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयासह स्थानिक पोलिस ठाण्याची पथके मंडळांसह यात्रोत्सवात पाहणी करणार आहे. कालिकादेवी मंदिर व भगूर येथील रेणुकादेवी मंदिर यात्रोत्सवात सशस्त्र पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दामिनी मार्शल्स, निर्भया पथकही बंदोबस्तात सहभागी होणार आहेत.
नाशिक ग्रामीण भागात सप्तशृंगगड, चांदवडची रेणुकादेवी, येवल्यातील जगदंबादेवी, कसारा घाटातील घाटनदेवी या ठिकाणी मोठ्या स्वरूपातील यात्रा भरणार आहेत. तसेच २१ पोलिस ठाणे हद्दीत ३० महत्त्वाच्या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होणार असून, ओझर, पिंपळगाव बसवंत, निफाड, वावी, सिन्नर, कळवण, अभोणा, देवळा, मनमाड, येवला शहर, सटाणा, मालेगाव छावणी या पोलिस ठाणे हद्दींत रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे.