

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढली होती. मात्र, दुसऱ्या माळेला मंगळवारी (दि. २३) पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने भाविकांची गर्दी काहीशी कमी झाली आहे. असे असले तरी देवीच्या जागरात भाविकांचा उत्साह अविरत आहे.
अलंकार मिरवणूक व नवरात्राच्या दुसऱ्या माळीच्या पंचामृत महापूजाचा मान ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी व इस्टेट कस्टोडियन यांना देण्यात आला. यानिमित्त देवीची आभूषणे भक्तिमय वातावरणात मंदिरात नेऊन देवीला घालण्यात आली. याबरोबरच पंचामृत महापूजा कळवण- सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी यांच्या यासह ग्रामपंचायत सदस्या बेबीबाई जाधव यांनी केली. यावेळी योगेश सोनवणे, रंजित उगले, संतोष पाटील, पोपट ठाकरे, भास्कर गावित, सचिन पैठणकर, दिगंबर भोये, नाना गांगुर्डे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, सुरक्षा कर्मचारी मधुकर धुमसे, मोतीराम चव्हाण, संदीप बेंडके यांच्या आदी उपस्थित होते.
हिरव्या पैठणीने खुलले सौंदर्य
दुसऱ्या माळेला श्री भगवतीला हिरव्या रंगाच्या भरजरी पैठणी वस्त्र नेसविण्यात आले. सोन्याचे मंगळसूत्र, वज्रटिक, कुयरी हार, मोहनमाळ, कर्णपुले, नथ, पुतळ्यांची गाठले, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपट्टा अशा दागिन्यांनी देवीला अलंकृत करण्यात आल्याचे देवीचे सौंदर्य अधिक खुलून गेले होते.
हिरवाईने खुलले निसर्ग सौंदर्या
पावसाच्या सरींमुळे गडाचा निसर्ग अधिक खुलून दिसत असताना, नवरात्रोत्सवाचा भक्तिभावाने भारलेला माहोल भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव देत आहे. त्यामुळे देवी दर्शनासाठी येणारे भाविक गड परिसरात पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत.
पावसाचा विक्रेत्यांना फटका
सततच्या पावसामुळे गडावरील दुकानांमध्ये पाणी साचल्याने अनेक व्यापाऱ्यांचे साहित्य ओले झाले. पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाल्याने भाविकांची ये-जा कमी झाल्याने विक्रीतही घट जाणवली. अनेकांनी आश्रयासाठी दुकानाचा आसरा घेतला. मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.