

येवला (नाशिक) : कोटमगाव येथील जगदंबा मातेची वार्षिक यात्रा नवरात्रोत्सवात नऊ दिवस भरते. महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे दाखल होतात. यावर्षी २२ सप्टेंबरपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. वाढत्या गर्दीचा विचार करून प्रशासनाने ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टला चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले.
यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी गुरुवार (दि. १८) प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस पोलिस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष रावसाहेब कोटमे आदी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ सप्टेंबरनंतर येवला–कोटमगाव मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक महाजन यांनी दिली. दुकानांच्या वाटपात अंतर ठेवणे, आधारकार्ड घेणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करणे अशा सूचना त्यांनी केल्या. भाविकांच्या वाहनांसाठी शेतात खासगी पार्किंगची सोय करून त्यासाठी ठराविक दर लावावेत, विजेच्या सुरक्षित जोडण्या द्याव्यात व नऊ दिवस अखंडित वीजपुरवठा ठेवावा, असे निर्देश प्रांताधिकारी गाढवे यांनी दिले.
यात्रेच्या काळात कडक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग, आपत्कालीन आरोग्य सुविधा, स्वच्छता मोहीम व शुद्ध पाणीपुरवठा यावर भर देण्याचे ठरले. मंदिर परिसरातील प्रकाशयोजना व स्वच्छतेबाबतही सूचना देण्यात आल्या.
दरवर्षी यात्रेला नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक येतात. यंदाही दोन ते अडीच हजार भाविक घटी बसतील, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दररोजच्या आरत्या, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन-भजन, पालखी सोहळा यांची तयारी करण्यात आल्याची माहिती जगदंबा देवस्थान अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त अंबादास भोसले, दिलीप कोटमे, अंबादास लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे आदींनी दिली. बैठकीस भाजप नेते नानासाहेब लहरे, सरपंच आशा कोटमे, उपसरपंच मनीषा माळी, सदस्या संध्या कोटमे, गणेश कोटमे, पोलिस पाटील मोनिका लव्हाळे, ग्रापंचायच अधिकारी विशाल तरवडे, अर्जुन कोटमे यांच्यासह सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.