Navratri festival 2024 | नवरात्रोत्सवासाठी नाशिककर सज्ज, आजपासून प्रारंभ

देवी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट
Navratri festival 2024 | नवरात्रोत्सवासाठी नाशिककर सज्ज, आजपासून प्रारंभ
Published on
Updated on

नाशिक : शक्ती आणि भक्तीचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्री उत्सवास गुरुवार (दि. ३)पासून प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून, घटस्थापनेचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत लगबग पाहायला मिळाली. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेले नांदुरीची श्री सप्तश्रृंगी देवी, नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामातेसह अन्य देवी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात शारदीय नवरात्रोत्सव. तब्बल २१ वर्षांनंतर यंदा हस्त नक्षत्र व इंद्र योग अशा दुर्मीळ सुवर्णकांचन योगावर घटस्थापना होणार आहे. विशेष म्हणजे अष्टमीची शतचंडी होमहवन (पूर्णाहुती) योग शुक्रवारी आला आहे. त्यामुळे चालू वर्षी नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवासाठी भाविक सज्ज झाले आहेत. सप्तशृंगगडावर नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच नाशिकची कालिकामाता, सांडव्यावरील देवी, जुन्या नाशिकमधील श्री भद्रकाली माता, भगूरची रेणुका माता, कोटमगावची जगदंबा, चांदवडची रेणुकामाता, इगतपुरीतील घाटनदेवीसह नाशिक शहर व ग्रामीण भागातील विविध देवींच्या मंदिरांमध्ये घटस्थापनेची लगबग सुरू आहे. या निमित्ताने मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा परिसरात घटस्थापनेसाठी लागणारी माती व पूजा साहित्य विक्रीची छोटी-मोठी दुकाने लागली आहेत. साहित्य घेण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली. त्यामुळे पितृपक्षामुळे गेल्या पंधरवड्यापासून बाजारपेठेत असलेली मरगळ दूर सरली आहे. पुढील नऊ दिवस वातावरण चैतन्यमय होणार आहे.

गरबा-दांडियाची तयारी

नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया हे सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. नाशिकमध्ये निरनिराळ्या सार्वजनिक मित्रमंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तेथे नऊ दिवस गरबा-दांडियाचे आयोजन केले आहे. तरुणाईमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

देवीची रुपे

पहिले रूप : शैलपुत्री

दुसरे रूप : ब्रह्मचारिणी

तिसरे रूप : चन्द्रघंटा

चौथे रूप : कूष्माण्डा

पाचवे रूप : स्कंदमाता

सहावे रूप : कात्यायनी

सातवे रूप : कालरात्रि

आठवे रूप : महागौरी

नववे रूप : सिद्धिदात्री

----

नवरात्रीचे रंग

गुरुवार : पिवळा

शुक्रवार : हिरवा

शनिवार : करडा

रविवार : केशरी

सोमवार : पांढरा

मंगळवार : लाल

बुधवार : निळा

गुरुवार : गुलाबी

शुक्रवार : जांभळा

कालिकादेवी संस्थानतर्फे विविध कार्यक्रम

ग्रामदैवता श्री कालिकादेवी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.३) पहाटे साडेपाचला विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना होईल. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सकाळी ७ ला महापुजा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याहस्ते ८ ला, तर मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते ९ वाजता महापूजा होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news