Navratri 2025: जगदंबामाता नवरात्रोत्सवासाठी सजले वणी सप्तशृंगगड; पंचामृत महापूजा, आरती, सवाद्य पालखीच्या वेळा जाणून घ्या

जगदंबा माता ट्रस्ट: शारदीय नवरात्रोत्सवाससाठीची तयारी पूर्ण
वणी ( नाशिक )
जगदंबा माता शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साह संचारला असून वणीकर सज्ज झाले आहेत.(छाया : अनिल गांगुर्डे)
Published on
Updated on

वणी ( नाशिक ) : सप्तश्रृंगीच्या अठरा भुजांची मूळरुप समजल्या जाणाऱ्या वणी येथील जगदंबा माता शारदीय नवरात्रोत्सवाससाठीची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

सोमवारी (दि. २२) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही सुमारे दीड हजार महिला भाविक नऊ दिवस घटी बसणार आहेत. त्यासाठी वॉटरप्रुफ सभामंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसर तसेच शेजारील तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि औषधोपचार मोफत दिला जाणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी ३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरण कंपनीला कळविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानक व गावातील प्रमुख रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सपोनि. जाधव यांनी सांगितले आहे. यंदा नवरात्रोत्सव काळात सुमारे पाच लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन व सामाजिक संस्था एकत्रितपणे कार्यरत आहेत. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रविण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रविंद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागिरदार आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

वणी ( नाशिक )
Navratra Fasting : डायबेटिज आहे? नवरात्रीमध्‍ये उपवास करताना ‘ही’ काळजी घ्‍याच

नवरात्रोत्सव काळातील धार्मिक नियोजन

नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा, सकाळी ९ वाजता आरती, सायंकाळी ६ वाजता देवीची सवाद्य पालखी आणि रात्री ७ वाजता महाआरती होईल. पालखीचा मान यंदा गणेश देशमुख यांच्या कुटुंबीयांकडे आहे. दुपारी २ ते ५ देवी भागवत तसेच रात्री ८ ते ११ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध भजनी मंडळांची भक्तिसंध्या आयोजित करण्यात आली आहे. महानवमीच्या दिवशी रात्री ८.३० वाजता मंदिर सभामंडपात शतचंडी याग होणार असून, रात्री १२ नंतर पारंपरिक कोहळा बळी व पूर्णाहूती दिली जाणार आहे.

सप्तशृंगगड ( नाशिक )
सप्तशृंग गड : पौराणिक पात्रांच्या वेशभुषेत काढण्यात आलेली दिंडी. (छाया : रघुवीर जोशी)

सप्तशृंग गडावर पारंपरिक वेशभूषेत दिंडी

सप्तशृंगगड ( नाशिक ) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १९) सप्तशृंग गडावर भाविकांनी पारंपरिक दिंडी काढली. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि पौराणिक पात्रांचे पोशाख परिधान करून सादर केलेल्या नृत्याविष्काराने वातावरण रंगले. रंगीत पोशाख, पारंपरिक नृत्यशैली आणि विविध व्यक्तिरेखांच्या अभिनयामुळे गड परिसरात उत्सवी जल्लोष अनुभवायला मिळाला. पावसाळी हवामान असूनही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आणि 'जय सप्तशृंगी माता'च्या जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून गेला.

दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त गड परिसरात व्यापाऱ्यांची लगबगही वाढली आहे. यात्रा काळात लाखो भाविक गडावर येतात. मंदिर परिसर, पायऱ्या व रस्त्यालगतच्या दुकानदारांकडून नव्या मालाची खरेदी, सजावट आणि स्टॉल उभारणी करण्यात येत आहे.

चांदवड ( नाशिक )
धुळे जिल्ह्यातील जोगशेलू येथे असलेल्या हजारो भाविकांच्या आराध्य कुलदेवता कुलस्वामिनी जोगेश्वरी माता यांचा शारदीय नवरात्र उत्सव यंदा नाशिक जिल्हास्तरीय पातळीवर प्रथमच वडनेर भैरव येथे साजरा केला जाणार आहे. Pudhari News Network

वडनेर भैरवला उद्यापासून कुलस्वामिनी जोगेश्वरी शारदीय नवरात्रोत्सव

चांदवड ( नाशिक ) : धुळे जिल्ह्यातील जोगशेलू येथे असलेल्या हजारो भाविकांच्या आराध्य कुलदेवता कुलस्वामिनी जोगेश्वरी माता यांचा शारदीय नवरात्र उत्सव यंदा नाशिक जिल्हास्तरीय पातळीवर प्रथमच वडनेर भैरव येथे साजरा केला जाणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा उत्सव पार पडणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वडनेर भैरव येथील सलादे बाबा दत्त मंदिरात गेल्या १३ वर्षांपासून हा उत्सव साजरा होतो. सलादे बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंदिर उभारण्यात आले आणि जोगेश्वरी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे ज्या भाविकांना मूळ स्थान जोगशेलू येथे जाणे शक्य नसते त्यांना येथेच कुलाचार करण्याची संधी मिळते. उत्सवाची सुरुवात सोमवार (दि. २२) सायंकाळी साडेसहा वाजता घटस्थापना व दांडिया कार्यक्रमाने होईल. २ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी - सायंकाळी सामुदायिक आरती व दांडिया होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी दुर्गाअष्टमीनिमित्त सकाळी होम-हवन, दुपारी होमाचा प्रारंभ व सायंकाळी पूर्णाआहूती दिली जाणार आहे. याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत कर्तुत्ववान महिलांचा जोगेश्वरी माता नारी गौरव सन्मान केला जाणार असून बालिका पूजनही पार पडेल.

या आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश सलादे यांच्यासह उपाध्यक्ष शांताराम जाधव, सरचिटणीस बापूसाहेब सलादे, चिटणीस सचिन जाधव, मार्गदर्शक विश्वस्त मधुकर पाचोरकर व विश्वस्त मंडळातील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news