

नाशिक: महाराष्ट्रासाठी अनेक पदके जिंकणाऱ्या एका उदयोन्मुख राष्ट्रीय खेळाडूचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे क्रीडा विश्वात आणि नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेला राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज अर्जुन सोनवणे (वय २०) याचा राजस्थानमधील कोटा रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अखिल भारतीय अंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून संघासह परतत असताना ही हृदयद्रावक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सोनवणे हा आपल्या महाविद्यालयाच्या संघासोबत अखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी गेला होता. ही स्पर्धा संपल्यानंतर तो रेल्वेने महाराष्ट्राकडे परत येत होता. रेल्वे राजस्थानमधील कोटा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना, पाणी बाटली घेण्यासाठी अर्जुन गाडीतून खाली उतरला. याच दरम्यान, त्याचा पाय अचानक घसरला आणि तोल जाऊन तो धावत्या रेल्वेगाडीच्या खाली फलाट आणि गाडीच्या सापटीत आला. या भीषण अपघातात अर्जुनच्या हात, पाय आणि शरीराचे इतर अवयव गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच, त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचेपर्यंत अर्जुनची प्राणज्योत मालवली होती. एका होतकरू आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या खेळाडूचा असा अकाली आणि अपघाती अंत झाल्याने खेडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.