

नाशिक : ओझर विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स या कंपनीतर्फे सुरू असलेली विमानसेवा सुसाट सुरू असून, दर महिन्याला विमानतळावरून प्रवासी संख्येचा नवा विक्रम नोंदविला जात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी 36 हजार 81 प्रवाशांनी उड्डाण घेत, नवा विक्रम नोंदविला आहे. ओझर विमानतळ सुरू झाल्यापासून ते आजतागायत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या नोंदविली आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात ओझर विमानतळावरून एकूण 2 लाख 42 हजार 372 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, 2024-25 मध्ये ही संख्या 3 लाख 41 हजार 112 वर पोहोचली. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 40.7 टक्के वाढ झाली. हा आनंद साजरा केला जात असताना, एप्रिल 2025 या महिन्यात प्रवासी संख्येचा आणखी नवा विक्रम नोंदविला गेला. एप्रिलमध्ये 150 फेर्यांमधून 17 हजार 810 प्रवासी नाशिकमध्ये उतरले, तर 150 फेर्यांमधून 18 हजार 271 प्रवाशांनी नाशिकमधून उड्डाण केले. महिनाभरात 36 हजार 81 प्रवाशांनी ये-जा केली. दरम्यान, ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीकडून अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि गोवा या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. हॉपिंग फ्लाइट्सची सुविधा मिळाल्याने प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणार्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने येथील धावपट्टीची संख्यादेखील वाढविण्याची मागणी होत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करता विमानसेवेचा विस्तार व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. लवकरच नाशिक नवीन शहरांना जोडले जाणार आहे. विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात येणार असल्याने सेवेचा विस्तार होऊन, नाशिकच्या विकासाला गती मिळेल.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा, नाशिक.