

एचआयव्ही बाधितांवर उपचार करण्यासाठी राज्यभरात सुमारे ५४ एआरटी सेंटर कार्यान्वित आहेत. त्यापैकी नाशिक जिल्हा रुग्णालयातील सेंटरने सर्वाधिक रुग्ण व संशयित चाचणी, बाधितांवर औषधोपचार, संधीसाधू आजारांवर उपचार केले आहेत. त्यामुळे राज्यात नाशिक सिव्हिलमधील एआरटी सेंटर उपचारामध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे.
राज्यभरात सुमारे ५४ एआरटी सेंटर कार्यान्वित
राज्यात नाशिक सिव्हिलमधील एआरटी सेंटर उपचारामध्ये प्रथम क्रमांकावर
१४ हजार १५३ बाधितांवर उपचार
जिल्ह्यात ३७५ अल्पवयीन मुला-मुलींना एचआयव्हीची बाधा आहे, तर ११ कैद्यांनाही एचआयव्ही असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत.
एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) सेंटर स्थापन केले आहेत. जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज येथे ही सेंटर आहेत. राज्यात ५४ ठिकाणी सेंटर कार्यान्वित असून, त्यामार्फत हजारो एचआयव्ही बाधितांवर उपचार केले जातात. त्यानुसार नाशिकमधील २००६ पासून सुरू झालेल्या एआरटी सेंटरमध्ये आतापर्यंत १६ हजार ४७७ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी १४ हजार १५३ एचआयव्ही बाधितांवर उपचार सुरू आहेत. यात संधीसाधू आजारांची नियमित तपासणी करण्याबरोबरच एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करणे, त्यांच्या पत्नी, पार्टनरची आरोग्य तपासणी करणे या गोष्टी एआरटी सेंटरमार्फत होत आहेत. त्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग मर्यादित ठेवण्यात यश मिळत असल्याचे आढळून आले.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत जिल्ह्यामध्ये नव्याने ६२९ एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. त्यातील सर्वांना औषधोपचार करण्यात आले. सखोल तपासणीत ३९ जणांना क्षयरोग झाल्याचे आढळले आहे, तर ४६ एचआयव्ही बाधित शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी सेंटरला आले. मात्र त्यांचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला. जून महिन्यात राज्यातील एआरटी सेंटरचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिकच्या सिव्हिलमधील एआरटी सेंटरमार्फत रुग्णांवर सर्वाधिक उपचार, समुपदेशन, चाचणी केल्याचे लक्षात आले. त्यामुळे विभागप्रमुख डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, नोडल अधिकारी डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी एआरटी सेंटरच्या पथकाचे अभिनंदन केले.
गत आर्थिक वर्षात २५ एचआयव्ही बाधित गर्भवतींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २२ गर्भवतींची प्रसूती झाली असून योग्य उपचारांमुळे एकाही बाळास एचआयव्हीची बाधा झालेली नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ३७५ अल्पवयीन मुला-मुलींना एचआयव्हीची बाधा आहे, तर ११ कैद्यांनाही एचआयव्ही असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत.
सिव्हिलच्या एआरटी सेंटरमध्ये डॉ. सुनील ठाकूर यांच्यासह डॉ. तुषार देवरे, डॉ. सपना सोनवणे हे उपचार करीत आहेत. तसेच समुपदेशक, परिचारिका, लॅब टेक्निशिअन, फार्मासिस्ट, डाटा मॅनेजर अशा १५ जणांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या सांघिक कामाच्या बळावर जास्तीत जास्त चाचण्या, समुपदेशन व उपचार होत आहेत.
चाचणीमध्ये बाधित आढळल्यानंतर रुग्णांचा विश्वास जिंकण्यावर पथकाचे लक्ष असते. त्यात त्यांना धीर देऊन औषधोपचार सांगितले जातात. तसेच भविष्यात काेणती खबरदारी घ्यावी, इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे याबाबत माहिती सांगितली जाते. तसेच त्यांचे जोडीदार, नातलग यांना विश्वासात घेऊन त्यांची ऐच्छिक चाचणी केली जाते.