नाशिक : उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच्या प्रकोपामुळे जिल्ह्याच्या पाऱ्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. निफाडचा पारा 7.2 अंशापर्यंत खाली आला आहे. नाशिकमध्येही तापमानात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या काळात गारठ्यात अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे.
थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांना पसंती
ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती होतेय गर्दी
येत्या काळात थंडीचा प्रकोप वाढण्याचा अंदाज
हिमालयातील बर्फवृष्टी तसेच मध्य भारतामधील मैदानी प्रदेशातील निरभ्र हवामानामुळे राज्यातील शीतलहरींचा वेग वाढला आहे. अवघ्या राज्यात सरासरी तापमानात 2 ते 4 अंशापर्यंत घट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालूक्याच्या तापमानात चोवीस तासांमध्ये 3.8 अंशाची घसरण झाली आहे. हवामानातील या बदलामुळे तालूकावासीयांना हुडहूडी भरली. तर द्राक्षबागांवरही त्याचा परिणाम हाेण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. त्यामुळे थंडीपासून बागा वाचविण्यासाठी आता सकाळ-सायंकाळ धूर-फवारणी केली जात आहे.
नाशिक शहर पहाटेच्या वेळी धुक्यात हरवत आहे. सायंकाळनंतर थंड वारे वाहत आहेत. शनिवारी शहराचा पारा ९.२ अंशापर्यंत खाली घसरला. त्यामूळे हवेत गारवा वाढल्याने शहरवासीय गारठून गेले. दरम्यान, जिल्ह्याच्या अन्य भागातही थंडीचा प्रकाेप वाढला आहे. सकाळच्या सुमारास थंडी अधिक जाणवत असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. गव्हासाठी हे वातावरण अनुकुल असले तरी अन्य पिकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.