नाशिककरांनो सावधान ! 'तुम्ही भेसळयुक्त अन्न तर खात नाही ना'?

जिल्ह्यात अडीच लाख किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
Nashik, Adulterated food
नाशिक जिल्ह्यात अडीच लाख किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्तFile Photo
Published on
Updated on
सतीश डोंगरे

नाशिक : पूर्वी सणवार आले की, भेसळयुक्त अन्न हमखास बाजारात आणले जायचे. प्रशासनही या काळात डोळे उघडे ठेवून असायचे. मात्र, आता अन्न भेसळ ही सामान्य बाब झाली असून, वर्षभर अन्न भेसळीचा धंदा जोरात असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर येत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोन लाख ६२ हजार ११० किलो भेसळयुक्त अन्न जप्त केले असून, त्याची किंमत सुमारे चार कोटी ७७ लाख ९४ हजार ४५ रुपये इतकी आहे. त्यामुळे 'तुम्ही भेसळयुक्त अन्न तर खात नाही ना' असा प्रश्न नाशिककरांनी स्वत:लाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

आकडे बोलतात

Summary
  • जप्त अन्नपदार्थ : २,६२,११० किलो

  • पदार्थांची किंमत : ४,७७,९४,०४५ (कोटी)

  • गुन्हे : १४ दिवाणी, १२ फौजदारी

  • नमुने - ३८७ पैकी २९८ भेसळयुक्त

धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात वर्षभर पर्यटकांची रेलचेल असल्याने, जिल्ह्यात हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, मिठाईच्या दुकानांचे मोठे जाळे आहे. मात्र, याठिकाणी मिळणारे अन्नपदार्थ विनाभेसळ आहेत हे सांगणे मुश्किल आहे. अन्न, औषध प्रशासनाच्या वर्षभरातील कारवाईत धक्कादायक आकडेवारी समोर येत असून, त्यामध्ये जिल्ह्यात अन्न भेसळीचा धंदा जोरात असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्येे भेसळयुक्त अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणात साठे आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भेसळ मसाले आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केली जात असल्याचे समोर आले आहे. पाठोपाठ अल्कोहोलयुक्त पदार्थांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Nashik, Adulterated food
Nashik Zika Virus | धक्कादायक | नाशिक महापालिकेने दडवला 'झिका' रुग्ण

प्रशासनाने वर्षभरात केलेल्या कारवाईत अन्नपदार्थांचे तब्बल ३८७ नमुने घेतले असून, त्यातील २९८ नमुन्यांमध्ये भेसळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ४७ नमुने असे होते की, ते आरोग्यास प्रचंड हानीकारक आहेत. तर २३ नमुन्यांमध्ये दंड न ठोठावता, थेट गुन्हा दाखल करणे हाच प्रशासनासमोर पर्याय होता. यातील २४ दुग्धजन्य पदार्थात इतक्या प्रमाणात भेसळ करण्यात आली होती की, त्यातही गुन्हा दाखल करण्याशिवाय प्रशासनास गत्यंतर नव्हते. गेल्यावर्षी प्रशासनाने १४ दिवाणी, तर १२ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, यातील चार गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

दरम्यान, अन्न प्रशासनाच्या मते, नाशिक जिल्ह्यात भेसळीचा धंदा तेजीत असून, वर्षभर विविध ड्राइव्हच्या माध्यमातून कारवाया सुरूच ठेवाव्या लागतात. एखाद्या विक्रेत्याकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्याचा नागरिकांना संशय असल्यास, त्यांनी अन्न प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

धार्मिकस्थळी सर्वाधिक भेसळ

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, वणीसह शहर व इतर भागांत प्रसिद्ध धार्मिक स्थळांची संंख्या मोठी आहे. याठिकाणी माोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवायांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी असलेल्या विक्रेत्यांवर बाराही महिने प्रशासनाचा डोळा असतो.

भेसळयुक्त अन्नपदार्थांचे गुजरात कनेक्शन

नाशिकमध्ये शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आणि मावा आणला जात असून, त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमधून समोर आले आहे. त्यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांचे कनेक्शन गुजरात असल्याने, यामार्गे येणाऱ्या अन्नपदार्थांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news