

चांदवड (नाशिक) : चांदवड पंचायत समितीच्या एकूण १० गणांपैकी सात गण राखीव करण्यात आले आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी बघावयास मिळाली. महिलांना ५० टक्के आरक्षणानुसार १० पैकी ५ जागा या महिलांसाठी राखीव झाल्याने पंचायत समितीवर आगामी काळात महिलाराज बघावयास मिळणार आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांमध्ये 'कहीं खुशी, कहीं गम' अशी अवस्था बघावयास मिळाली. आरक्षणामुळे गणातून उमेदवारी देताना राजकीय मंडळींची दमछाक होणार आहे.
येथील नूतन प्रशासकीय इमारतीत उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय कचवे यांच्या उपस्थितीत दहा गणांची आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३) १२ वाजता काढण्यात आली. यात अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग २ व सर्वसाधारण जागेसाठी ५ असे एकूण १० जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. यावेळी शासनाच्या आदेशान्वये चिठ्ठीद्वारे ५० टक्के आरक्षणानुसार १० जागांपैकी ५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. आरक्षण सोडतीस पिंटू भोईटे, देवीदास आहेर, मनोज किरकांडे, प्रभाकर ठाकरे, नीलेश ढगे, दिगंबर वाघ, सागर निकम, अरुण न्याहारकर आदी उपस्थित होते.
गणनिहाय आरक्षण असे
धोडंबे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, राहुड- सर्वसाधारण (महिला), दुगाव- सर्वसाधारण, कुंदलगाव - अनुसूचित जाती, बहादुरी- अनुसूचित जमाती (महिला), वडनेर भैरव- अनुसूचित जमाती, वडाळीभोई- सर्वसाधारण (महिला), पिंपळद- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), वाहेगावसाळ- सर्वसाधारण, तळेगावरोही- सर्वसाधारण (महिला).
नाशिक : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आारक्षण सोमवारी (दि.१३) काढण्यात आले. नाशिक तालुक्यातील ४ गट व ८ गणांचेही आरक्षण जाहीर झाले. त्यात खुल्या प्रवार्गातील उमदेवारांचा हिरमोड झाला आहे. चार पैकी तीन गट राखीव झाले आहेत. त्यात गिरणारे आणि गोवर्धन हे दोन गट आदिवासींसाठी तर एकलहरे हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. गोवर्धन गट हा सलग दुसऱ्यांदा आदिवासींसाठी राखीव झाला. यावेळी महिलेला संधी मिळणार आहे. केवळ पळसे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव झाला आहे. तर आठ गणांतील सय्यदपिंप्री अन् लहवित हे दोन्ही खुले झाले आहेत. पळसे व विल्होळी (स्त्री) गण नामप्रसाठी राखीव झाले असून, एकलहरे गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. विशेष म्हणजे, गिरणारे, देवरगाव हे दोन्ही गण अनुसूचित जमाती महिलेसाठी तर गोवर्धन गण हा अनुसूचित जमातीसाठी खुला झाला आहे.
-----
तालुक्यातील दिग्गज इच्छिकांचा हिरमोड
गट व गण आरक्षणामुळे नाशिक तालुक्यातील अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. यंदा अनेकांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु, आरक्षण व महिला राखीव गटाने सर्वच समीकरणे बदलली आहेत.