

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळतील, हे सुनिश्चित करा, असे विभागप्रमुखांना आदेश दिले खरे. मात्र, जिल्हा परिषद मुख्यालयात बसविलेले वाॅटर फिल्टर बंद अवस्थेत आहे. काही फिल्टरमध्ये तर, घाण साचलेली आहे. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याची अवस्था असल्याने अभ्यागतांना पाणी कुठे मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपूर्ण जिल्हाभरातील ग्रामस्तरीय पाण्याचे नियोजन जि.प.कडून होत असते. दुसरीकडे, जि.प. मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे तसेच ठेकेदारांचे हाल होत असल्याचे वास्तव दैनिक 'पुढारी'ने मागील वर्षी मांडले होते. त्याची दखल घेत मुख्यालयात विविध विभागांत फिल्टर बसविले गेले. सुरुवातीला ते काही दिवस सुरू होते. मात्र, सद्यस्थितीत ते बंद अवस्थेत दिसत आहेत. मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही खासगी संस्थेने फिल्टरची व्यवस्था करून दिली. मात्र, हे फिल्टर सुरू झालेले नाही. दुसरीकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या फिल्टरमधूनच मुख्यालयातील सर्व कर्मचारी पिण्याचे पाणी वापरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या एका फिल्टरवरच सर्वांची तहान भागविण्याचा भार आहे. मात्र, त्याविषयी कल्पना नसणाऱ्यांना जवळील हाॅटेल गाठावे लागते. विकतचे बाटलीबंद पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागते. मुख्यालय इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. यावर लाखोंचा खर्च केला जात आहे. त्यातच, पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी दालनात पिण्याच्या पाण्यासाठी माजी सभापती संजय बनकर यांनी स्वखर्चातून फिल्टर बसविले आहे. मात्र, प्रशासकीय राजवट असल्याने पदाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप आहे. या ठिकाणी असलेले फिल्टरदेखील बंद दाराआड गेले आहे. या फिल्टरचा वापर करता यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.