

नाशिक : पाण्याची सुरक्षितता खूप महत्त्वाची असून सर्वांसाठी शुद्ध व शाश्वत पाण्याची उपलब्धता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत गुरूवारी (दि.१९) पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या रावसाहेब थोरात सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
मित्तल यांनी पाणी गुणवत्ता हा विषय अतिशय महत्त्वाचा असून यामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्तेबाबत ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी दुषित पाण्यामुळे होणारे साथरोग व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना स्वच्छता सर्वेक्षण, टीसीएलची साठवण, अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार याबाबत माहिती दिली. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक किरण कांबळे यांनी तालुक्यातील प्रयोगशाळा सरंचना व कामे याबाबत तर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक राहुल बयानी यांनी टीसीएलचा वापर, साठवणूक व तपासणीबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रवींद्र बराथे यांनी केले. यावेळी प्रश्नावलीच्या आधारे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची निवड करून त्यास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंग यांच्यासह गटविकास अधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्व्यक व जिल्हा कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
पाणी गुणवत्ता हा दैनंदिन जीवनात महत्वाचा विषय असून प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ व शुध्द पाणी पुरविण्यासाठी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची रासायनिक व जैविक तपासणी करावी. तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता बैठका नियमित घ्याव्यात तसेच टीसीएलचा दर्जा व तपासणी करण्यात यावी अशी माहिती प्रस्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.