

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डोक्यावर घोंघावणारे 'अर्णब' चक्रीवादळ, हवेचा नगण्य दाब आणि हाडे गोठवणारे उणे ५५ अंश सेल्सिअस तापमान... अशा अत्यंत आव्हानात्मक वातावरणात चक्क पृथ्वीपासून २५.७ किलोमीटर उंचीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कार्यरत ठेवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारतीय तरुणांनी करून दाखवला आहे. 'बाँस्कॉन स्पेस' या संशोधन पथकाने 'हाय-अल्टिट्यूड बलून'च्या साहाय्याने ही मोहीम यशस्वी केली.
विशेष म्हणजे, अवकाशात भविष्यातील डेटा सेंटर्स उभारण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरलेल्या या मोहिमेचे नेतृत्व नाशिकचा सुपुत्र श्लोक खैरार याने पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसह (आदित्य शिदे व पार्थ कैरामकोंडा) केले आहे.
सोलापूरजवळून या विशेष हाय-अल्टिट्यूड बलूनचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. याच काळात पूर्वेकडून पश्चिम घाटाच्या दिशेने सरकत असलेल्या 'अर्णब' चक्रीवादळाचा प्रभाव या संपूर्ण पट्ट्यात जाणवत होता. प्रतिकूल हवामानाचे मोठे आव्हान समोर असतानाही पथकाने मोहीम पुढे नेली.
बलून जसजसा वर गेला, तसतशी त्यावरील अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी चारही दिशांना शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या चक्रीवादळाची विस्तीर्ण आणि दाट ढगांची दृष्ये अचूकपणे टिपली.
भविष्यकाळात अवकाशात सौर ऊर्जेवर चालणारी महाकाय डेटा सेंटर्स उभारणे आणि पृथ्वीवरून त्यांचा सुलभ वापर शक्य करणे, हे 'बाँस्कॉन स्पेस'चे दीर्घकालीन ध्येय आहे. या यशस्वी चाचणीमुळे अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात पुणे आणि महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने झळकले आहे.
बलून जसजसा स्ट्रॅटोस्फेरियामध्ये (समताप मंडळ) पोहोचला, तसतसे बाहेरील तापमान कमालीचे घसरून उणे ५५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. सामान्यतः अशा गोठवण्याच्या तापमानात आणि अंतराळातील रेडिएशनमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संगणकीय चिप्स निष्प्रभ ठर्तात.
मात्र, पथकाने तयार केलेली यंत्रणा आणि संगणक या थंडीतही पूर्ण कार्यक्षमतेने सुरू राहिले. या मोहिमेदरम्यान अवकाशात कार्यरत असलेल्या या एआय मॉडेलने विविध प्रकारच्या तब्बल ४११ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन स्वतःची क्षमता सिद्ध केली.
पाराशूटच्या साहाय्याने ६२.७ किमी अंतरावर सुरक्षित लँडिंग उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर बलूनचा पेलोड पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे खाली आणण्यात आला. प्रक्षेपणस्थळापासून ईशान्य दिशेला सुमारे ६२.७ किलोमीटर अंतरावर हा पेलोड सुखरूप जमिनीवर उतरला. संशोधन पथकाने तत्काळ मागोवा घेत कोणत्याही नुकसानाशिवाय हा पेलोड ताबात घेतला.