Nashik Rain : येवल्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; घरांची पडझड, वीज खांब कोसळले

नगरसुल आणि लहीत शिवारातील परिसर अंधारात
Nashik Rain
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांची व गोठ्यांची पडझड झाली
Published on
Updated on

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल आणि लहीत शिवारात शनिवारी (२३ मे) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी गारांच्या पावसाने आणि वादळाने प्रचंड कहर केला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांच्या घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून शेतात साठवून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे महावितरणचे तब्बल १५ वीज खांब कोसळल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे.

वादळाचा वेग इतका प्रचंड होता की लहीत शिवारातील शेतकरी ताराचंद बाळाराम परदेशी आणि छबुराव भाऊराव पैठणकर यांच्या घरांची छते उडून गेली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच नगरसुल येथील लाला कुडके यांच्या शेतातील गाईच्या गोठ्याच्या भिंती कोसळल्या असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. लहीत, जायदरे, किडीसाठे, पिंपळखुटे, हडप सावरगाव या संपूर्ण परिसरात अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

येवला परिसरातील मुख्य पीक असलेल्या कांद्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला आहे, ज्यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news